पाउलें चालती पंढरीची वाट : डिजिटल वारीतून थेट

दैनिक प्रभातच्या डिजिटल वारीच्या माध्यमातून मी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतचा प्रवास संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीसोबत करत आहे. पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे असा प्रवास करत आज आम्ही वारीसोबत नीरेमध्ये दाखल झालो आहोत. वारी कव्हर करत असताना येत असलेले अनुभव विलक्षण असून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हे वारकरी दररोज काही किलोमीटरचे अंतर पायी कपात असतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच पावसाने हजेरी लावली असून या मान्सून पावसासोबत वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मुक्‍कामाच्या ठिकाणी जमा होणारा चिखल असोत की पावसाने आलेला क्षीण असो वारकऱ्यांना अशा कोणत्याच अडचणी पंढरीच्या दिशेने आगेकूच करण्यापासून रोखू शकत नाहीत. सुरुवातीला वारी कव्हर करण्यासाठी निवड झाल्यानंतर मनामध्ये अनेक शंका-कुशंकांनी घर केले होते; मात्र वारीसोबत जात असताना शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही अशी एक वेगळीच शक्ती, एक वेगळाच उत्साह अंगात संचारल्याचे जाणवते. वारकऱ्यांचा पराकोटीचा उत्साह पाहून हुरूप चढतो आणि आपोआप पुढे जाण्याचा उत्साह वाढत जातोय.

वारीचा अनुभव घेत असतानाच आपणही समाजाचे देणे लागतो अशा भावनेतून सेवाभावी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी गाठी-भेटी घडत आहेत. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना औषध उपचार उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, अन्न वाटप करणाऱ्या संस्था, व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या संस्था, कचरा उचलणाऱ्या संस्था अशा विविध कारणांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या स्वयंसेवकांशी दैनिक प्रभातच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. या स्वयंसेवकांमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्याची जी प्रबळ इच्छाशक्ती आहे ती पाहून आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो आणि या स्वयंसेवकांचं कौतुकही! जेजुरीमध्ये पालखी मुक्‍कामी असताना असाच एक अविस्मरणीय अनुभव आला.

पालखी जेजुरीमध्ये विसावल्यानंतर वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी फिरत होतो. एका पालखी तळावर वारकऱ्यांशी संवाद साधताना त्या समूहातील सर्व वारकरी कॉलेजचे मित्र असल्याची माहिती मिळाली. वयाची जवळपास वर्ष पूर्ण केलेले हे वारकरी कॉलेज जीवनापासून मित्र असून ते गेल्या पाच वर्षांपासून वारीमध्ये व्यसनमुक्तीचा मोलाचा संदेश देण्याचं काम करीत आहेत. वारीत चालत असताना वारीतील वारकऱ्यांकडून तंबाखूची पुडी मागून घ्यायची आणि त्या वारकऱ्याला ही तंबाखूची पुडी विठ्ठलाने मागितली असून इथून पुढं तंबाखूचे व्यसन करू नका, असा विठ्ठलाचा आदेश आहे असं ते सांगतात. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून त्या वारकऱ्याला फळझाडांच्या बिया देखील दिल्या जातात. हे आणि असे अनेक समाज उपयोगी उपक्रम दैनिक प्रभातच्या पाउलें चालती पंढरीची वाट या डिजिटल वारीच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहेत.

वारीतील असेच अनुभव जाणून घेण्यासाठी तसेच अन्य अपडेट्‌स मिळविण्यासाठी तुम्ही दैनिक प्रभातच्या युट्युब चॅनेलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करू शकता. जय हरी!

– संदीप कापडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)