पांडित्य आणि शहाणपण… 

डॉ. न. म. जोशी 

विद्वानांच्या एका सभेत चर्चा सुरू होती. विषय होता पांडित्याचा! सर्वात ज्ञानी कोण, पंडित कोण, तो कसा समजावा, या विषयावर चर्चा सुरू होती. अनेक विद्वानांनी आपली मते परखडपणे मांडली. ज्ञानाची महती गायिली. एकजण केवळ ऐकत होता. सर्वांची चर्चा शांतपणे ऐकत होता. बोलत काहीच नव्हता त्याचं नाव अभिराम!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतर सर्व पंडितांनी अभिरामला विचारलं,

“अभिराम तू काहीच बोलत नाहीस.’

“नाही बोलत. कारण माझी मतं वेगळी आहेत.ज्ञानी पुष्कळ असतील. पण ज्ञानाचा उपयोग शहाणपणानं जो करतो तो खरा ज्ञानी,’ अभिराम म्हणाला.

“ते कसं काय? पटवून दे.’

“देतो. पण त्यासाठी तुम्हाला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल,’ अभिरामनं अट घातली.

“ऐकतो. आम्ही सारे. सांग तुझी गोष्ट.’ पंडितजन म्हणाले. मग अभिराम गोष्ट सांगू लागला. सर्व सभा शांतपणे ऐकत होती.

“एका जंगलाच्या वाटेनं दोन ज्ञानी पंडित चालले होते. दोघांचाही संवाद सुरू होता. त्यांना आपण जयदेव आणि रामदेव म्हणू. जयदेव हे महापंडित होते. त्यांना अनेक विद्या येत होत्या. गूढ विद्यांचाही त्यांचा अभ्यास होता. रामदेवही विद्वान होते. पण जयदेवाइतका गूढविद्यांचा अभ्यास नव्हता. संवादाचेवेळी जयदेव रामदेवाला म्हणाले…

“मी इतका अभ्यास केला आहे की, कोणत्याही मृत अवशेषांवर मी हे अभिमंत्रित जल शिंपडले तर त्याला मी जिवंत करू शकतो. समोरच एका सिंहाच्या अस्थी पडल्या होत्या. जयदेव म्हणाले, मी या सिंहाला जिवंत करतो. रामदेव यावेळी झाडावर चढून बसले. जयदेवांनी सिंहावर अभिमंत्रित जल शिंपडले. सिंह जिवंत झाला. त्यानं डरकाळी फोडून जयदेवावरच हल्ला केला. त्याला मारून मांस खाऊन अस्थिपंजर तिथंच टाकून सिंह निघून गेला. मग रामदेव झाडावरून खाली उतरला. शेजारच्या कमंडलूतलं अभिमंत्रित जल त्यानं जयदेवाच्या सांगाड्यावर शिंपडलं. जयदेव जिवंत झाला. मग दोघेही सुखरूपपणे अरण्यातून गेले. आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे जयदेवाला कळलं नाही. त्यामुळं त्यानं

स्वतःचाच घात करून घेतला. उलट स्वतःला वाचवून रामदेवानं तेच अभिमंत्रित जल शिंपडून जयदेवाला जिवंत केलं. त्याला ज्ञानाचा उपयोग शहाणपणानं कसा करावा हे समजलं होतं.’ सर्व पंडितांनी टाळ्या वाजवल्या. ज्ञानापेक्षा शहाणपण मोठं हे ते समजले.

कथाबोध 

ज्ञान हे ज्ञानासाठी नसते तर त्याचा उपयोग शहाणपणानं करून स्वतःचा, समाजाचा, राष्ट्राचा उद्धार करावा यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. ज्ञान हे विघातही असू शकतं. पण शहाणपणानं उपयोग केला तर तेच ज्ञान विधायक आणि सर्जनशील कार्यासाठी उपयोगात आणता येतं. ज्ञान जाणलं म्हणजे केवळ ब्रह्म जाणलं, असं कधीच समजू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)