पहिल्या दिवशी पुस्तके देवून विद्यार्थ्यांचे स्वागत

गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांची माहिती : नियोजनासाठी कर्जतला शिक्षकांचे चर्चासत्र
खेड- कर्जत तालुक्‍यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देवून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. तालुक्‍यातील एकही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये म्हणून काटेकोर नियोजन करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.
नविन शैक्षणिक वर्षाची शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी कर्जतला चर्चासत्र घेतले. यामधून शिक्षकांना अध्यापन तसेच प्रवेशोत्सव कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे दर महिन्यातून एकदा चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये शिक्षकांचे काम पाहून त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी बक्षीस ठेवले जाणार आहे.
अनेक प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी 14 जूनलाच शाळेत येवून प्रवेशोत्सवाचे नियोजन सुरू केले. शाळेच्या वर्गखोल्या, क्रीडांगण तसेच परिसराची स्वच्छता करून घेण्यात आली.शुक्रवारी परिपाठ होताच प्रवेशोत्सव कार्यक्रम दिमाखात पार पडणार आहे.
पुस्तकांना विलंब झाल्यास झेरॉक्‍स प्रती
या शैक्षणिक वर्षापासून पहिली व आठवी या इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला आहे.मात्र या इयत्तेची पुस्तके अद्याप कर्जत तालुक्‍यात उपलब्ध झालेली नाहीत.जर पुस्तके उपलब्ध होण्यास विलंब झाला तर उपलब्ध असलेल्या ई- पुस्तकांच्या प्रिंट विद्यार्थ्यांना देण्यात येतील असे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे म्हणाले.

शाळांमध्ये नियोजन…
नविन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शाळांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. गुलाबपुष्प, मिठाई, पुस्तके, शालेय साहित्य आदी वस्तू भेट देवून प्रवेशोत्सव करण्याचे शाळांमध्ये नियोजन आखण्यात आले आहे. संस्थांच्या शाळा, विद्यालयामध्ये संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. प्रवेशोत्सवासाठी सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांना निमंत्रित करून कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे शिक्षण विभागाने शाळांना सुचित केलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)