पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवर पार्किंग धोरण

अंमलबजावणीबाबत लवकरच पक्षनेत्यांची बैठक – महापौर

पुणे – शहरासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिची पहिली बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

मे-2018 मध्ये या धोरणास मुख्यसभेने मान्यता दिलेली आहे. मात्र, यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला घेरल्याने तसेच नागरिकांनीही नाराजी व्यक्त केल्याने भाजपने सावध भूमिका घेत पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील खासगी वाहनांना आळा तसेच वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर पार्किंग धोरण प्रस्तावित केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात पार्किंग शुल्क प्रस्तावित केले होते. यामुळे नागरिक रस्त्यावर खासगी गाड्या आणणार नाहीत, तसेच सार्वजनिक वाहने वापरतील यासाठी हा प्रस्ताव ठेवल्याचे तत्कालिन आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, हे शुल्क मोठ्या प्रमाणात असल्याने विरोधी पक्षांनी या धोरणावरून भाजपची चांगलीच कोंडी केली. त्यामुळे भाजपनेही या प्रस्तावास नकार दर्शविला. त्यामुळे तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत त्यांच्याकडून हा प्रस्ताव भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर करावा, यासाठी दबाव आणला. त्यामुळे भाजपने हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, त्याचवेळी या धोरणात प्रस्तावित केलेले पार्किंग शुल्क तसेच पहिल्या टप्प्यात प्रमुख पाच रस्त्यांवरच या योजनेची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करावी, अशी उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महापौरांचा अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची समितीही नेमण्यात आली. या समितीची अजून एकही बैठक गेल्या सहा महिन्यांत झालेली नाही. त्यामुळे या धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी पक्षनेत्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)