पहिल्या कसोटी सामन्यावर भारताचे वर्चस्व 

वेस्ट इंडीजचा संघ फॉलोऑनच्या छायेत 
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना 
राजकोट- भारत आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवताना आपला पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषीत केल्यानंतर वेस्ट इंडीजची पहिल्या डावात दिवस अखेर 6 बाद 94 अशी अवस्था करताना पहिल्या कसोटी सामन्यावर निर्विवाद वर्चस्व राखले असून वेस्ट इंडीजचा संघ अद्याप 555 धावांनी पिछाडीवर असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना आणखीन 355 धावांची गरज आहे.

भारताच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ आपल्या पहिल्या डावात पुरता कोलमडला असून विंडिजचा निम्मा संघ शंभरीच्या आतच माघारी परतला आहे. मोहम्मद शमीने सलामीच्या दोन्ही फलंदाजाना माघारी धाडत विंडिजला धक्के दिले. यानंतर रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा यांनी 1-1 बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक धक्का दिला. अखेर रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी अखेरची काही षटकं खेळून काढत संघाची पडझड थांबवली. दुसऱ्या दिवसाअखेरीस वेस्ट इंडिजने 6 गड्यांच्या मोबदल्यात 94 धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा रोस्टॉन चेस नाबाद 27 तर किमो पॉल नाबाद 13 धावांवर खेळत आहेत.

-Ads-

तत्पूर्वी, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांनी केलेल्या ऐतिहासीक कामगिरीच्या जोरावर भारताने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषीत केला. सामन्यात पदार्पणवीर पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजायांनी केलेल्या शतकी खेळी आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजसामोर 650 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पदार्पणवीर पृथ्वी शॉने खणखणीत शतक ठोकत वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाच्या खेळावर छाप पाडली. विराटने एक बाजू लावून धरत आपले 24 वे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकासोबतच विराटने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. तसेच अवघ्या 72 कसोटीत 24 शतके फटकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर रिषभ पंतनेही कसोटी क्रिकेट मधिल आपले पहिले अर्धशतक केले. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात पंत 92 धावांवर बाद झाला आणि त्याला शतकाने हुलकावणी दिली.

तर अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात 649 धावांपर्यंत मजल मारली आहे. रविंद्र जाडेजाने तळातल्या फलंदाजांना सोबतीला कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. जाडेजाने शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. जाडेजाने नाबाद 100 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले आहेत.

त्याआधी पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीची नोंद केली. ऋषभ पंतच्या साथीने संघाचा किल्ला लढवत विराटने आपल्या कारकिर्दीतलं 24 वं शतक झळकावलं. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेही आक्रमक फटकेबाजी करत विराटला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत पंतने काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत आपलं शतक साजरं करेलं असं वाटत असतानाच देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.

अखेर उपहारानंतर विराट कोहलीला माघारी धाडण्यात वेस्ट इंडीजला यश आलं. लुईसच्या गोलंदाजीवर देवेंद्र बिशुने कोहलीचा झेल घेतला. कोहलीने 230 चेंडूत 139 धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूने जाडेजाने किल्ला लढवत ठेऊन आपलं पहिलं वहिलं शतक साजरं केले. वेस्ट इंडिजकडून देवेंद्र बिशुने 4 तर शेरॉन लुईसने 2 बळी घेतले. दरम्यान देवेंद्र बिशूने चार फलंदाजांना बाद करताना दोनशेपेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. बिशूने वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक 54 षटके टाकली. या 54 षटकांमध्ये त्याने तब्बल 217 धावा दिल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक –
भारत 149.5 षटकांत 9 बाद 649 घोषीत (विराट कोहली 139, पृथ्वी शॉ 134, रविंद्र जडेजा नाबाद 100, ऋषभ पंत 92, देवेंद्र बिशू 217-4), वेस्ट इंडीज 29 षटकांत 6 बाद 94 ( रोस्टॉन चेस नाबाद 27, किमो पॉल नाबाद 13, मोहम्मद शमी 11-2).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)