‘पहिली मंडळी’च्या निवडणूक विरोधातील अर्ज फेटाळले

औरंगाबाद खंडपीठाचा निकाल : निवडणुकीच्या पडघममुळे सभासंदामध्ये उत्सुकता

नगर – अहमदनगर पहिली मंडळी (कॉन्ग्री) डी-18, या चर्च न्यास संस्थेच्या विश्‍वस्त मंडळ निवडणुकीचा मार्ग आता अधिकच सुकर झाला आहे. या निवडणुकीच्या आदेशाला मनाई हुकूम आणि त्यावर पुन्हा झालेल्या निवडणुकीच्या आदेशाच्या निकालाचा पुनरावलोक अर्ज, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याची माहिती नंदप्रकाश शिंदे यांनी दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे विश्‍वस्त मंडळाच्या निवडणुकीचे पडघम कधीही वाजू शकतात. सुमारे 15 ते 20 वर्षानंतर चर्च न्यास संस्थेची निवडणूक होणार असल्याने सभासदांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अहमदनगर पहिली मंडळी (कॉन्ग्री) डी-18, या चर्च न्यास संस्थेच्या विश्‍वस्त मंडळाची गेल्या 15 ते 20 वर्षात लोकशाहीपद्धतीने निवडणूक झालेली नाही. यासंदर्भात सनी मिसाळ व नंदप्रकाश शिंदे यांनी पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त यांच्यासमोर अर्ज दाखल केला होता.

सहआयुक्त शिवाजी कचरे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. निवडणूक घेण्याचा आदेश देत अहमदनगरमधील धर्मदाय उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक पी. एम. आंधळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या आदेशाविरोधात जॉन्सन विल्यम शेक्‍सपियर यांच्यासह चार जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत रिट पिटीशन दाखल केले होते.

अहमदनगर पहिली मंडळी (कॉन्ग्री) डी-18 चर्च न्यासच्या विश्‍वस्त पदावर जॉन्सन शेक्‍सपियर यांची मुदत 2014-15 या वर्षासाठी होती. ही मुदत संपूनही शेक्‍सपियर अनाधिकाराने विश्‍वस्त राहिल्याचा आरोप नंदप्रकाश शिंदे यांनी केला आहे. निवडणुकीच्या विरोधात शेक्‍सपियर यांनी केलेले आतापर्यंत सर्व अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. न्यासाच्या निवडणुकीचे सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत. निवडणुकीद्वारे सर्वांना समान संधी मिळत असताना देखील शेक्‍सपियर वारंवार न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. त्यांचा हा प्रकार न्यासातील लोकशाहीला मारक असल्याची सभासदांची भावना झाली आहे. त्यांच्या या भूमिकेला सभासद कंटाळले असले, तरी न्यायालयाने निकाल देत न्यासातील लोकशाही जिवंत ठेवली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे न्यासातील सभासदांमध्ये निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची उत्सुकता वाढली आहे.
– नंदप्रकाश शिंदे

न्यायमूर्ती गंगापुरवाला व कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. या न्यायमूर्तींनी 25 ऑक्‍टोबर 2018 नंतर निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय दोन्ही बाजूच्या वकिलांच्या सहमतीने दिला. परंतु या निकालावर जॉन्सन शेक्‍सपियर यांनी पुन्हा आक्षेप घेत निकालाच्या पुनरावलोकनार्थ औरंगाबाद खंडपीठात 28 ऑगस्टला अर्ज दाखल केला होता.

औरंगाबाद खंडपीठाने या पुनरावलोकन अर्जावर नाराजी व्यक्त करत तो फेटाळून लावला. न्यासाच्या अस्तित्त्वात असलेल्या घटनेनुसार निवडणूक 25 ऑक्‍टोबरला घेण्यात यावी, असा आदेश दिल्याची माहिती नंदप्रकाश शिंदे यांनी दिली. मिसाळ व शिंदे यांच्यावतीने ऍड. श्रीकिशन शिंदे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)