पहिली ते बारावीचे शुल्क काळसूसंगत करा – शिक्षण आयुक्‍त

शिक्षण आयुक्‍तांचे शासनाला पत्र : अजुनही 40 वर्षांपुर्वीचे शुल्क लागू
पुणे – राज्यात अकरावी प्रवेशादरम्यान जाहीर करण्यात आलेले शुल्क हे 40 वर्षांपुर्वीचे असून त्यात बदल करावे अशी मागणी झाल्यानंतर शिक्षण आयुक्‍तांनी विविध निवेदनांचा आधार घेत राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत आकारण्यात येणारे शुल्क हे महागाईचा दर लक्षात घेता काळसुसंगत करावे अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी शासनाला पत्र लिहिले आहे.
अकरावी प्रवेशादरम्यान अनुदानित महाविद्यालयांनी शुल्क घेण्याबाबत अद्यापही संभ्रम सुरूच आहे. अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या माहितीपुस्तिकेत अद्यापही 1977-78 नुसारच प्रवेश शुल्क घेतले जावेत अशा सूचना आहेत. प्रत्यक्षात महागाई वाढल्याचे कारण देत अनेक अनुदानित महाविद्यालये वेगवेगळ्या मथळ्यांखाली विद्यार्थ्यांकडून वाट्टेल ते शुल्क आकारत आहेत. ही बाब दैनिक “प्रभात’ने सर्वांत आधी 2016 सालीच शासनाच्या लक्षात आणून दिली होती. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई झालेली नव्हती. दरम्यान, याबाबत “सिस्कॉम’ या शैक्षणिक संस्थेच्या संचालिका वैशाली बाफना यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी 25 जुलै रोजी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून सर्वच शुल्क ही महागाईचा दर लक्षात घेऊन ठरविण्यात यावीत याबाबत विनंती केली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे…
अकरावी बारावी तसेच मुलींना मोफत शिक्षण या योजनेत सुध्दा चाळीस वर्षांपुर्वी ठरविलेल्या शुल्कानुसार आकरणी करण्याच्या सूचना आहेत. यात बदल न झाल्याने महाविद्यालय आपल्या स्तरावर सोईचे शुल्क आकारत आहेत. त्यामुळेच शुल्क अधिनियमन कायद्यानुसार या शुल्कात सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्व निवेदनांचा एकत्रित विचार करता सद्यस्थितीत महागाईचा निर्देशांक लक्षात घेऊन शालेय शिक्षण स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी या सर्वच स्तरावरील शासनमान्य शुल्काच्या सुधारणा करणे उचित ठरेल असेही सोळंकी यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)