पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना: भारतीय महिलांचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

गॅले: मानसी जोशी आणि पूनम यादव यांची प्रभावी गोलंदाजी आणि स्मृती मंधानाची धडाकेबाज नाबाद अर्धशतकी खेळी यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या महिलांचा 9 गडी आणि 181 चेंडू राखून दणदणीत पराभव करताना आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेत विजयी सलामी दिली.

घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंकेच्या महिला संघाचा डाव भारतीय महिला संघाने 35.1 षटकांत सर्वबाद 98 धावांवर गुंडाळला आणि सामन्यावर वर्चस्व मिळविले. त्यानंतर स्मृती मंधाना व पूनम राऊत यांच्या शानदार सलामी भागीदारीमुळे भारतीय महिलांनी 19.5 षटकांत एक बाद 100 धावा फठकावून एकतर्फी विजयाची नोंद केली.

स्मृती मंधानाने केवळ 76 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 73 धावांची आकर्षक खेळी करताना पूनम राऊतच्या साथीत भारतीय महिला संघाला 18.4 षटकांत 96 धावांची पायाभरणी करून दिली. इनोका रणवीराने पूनम राऊतला बाद करून श्रीलंकेला एकमेव यश मिळवून दिले. परंतु स्मृती मंधानाने कर्णधार मिताली राजच्या साथीत भारतीय महिलांचा विजय साकार केला. पूनम राऊतने 41 चेंडूंत 2 चौकारांसह 24 धावा केल्या.

त्याआधी श्रीलंकेच्या महिला संघाकडून कर्णधार चमारी अटापट्टू, श्रीपाली वीराकोड्डी व दिलानी सुरंगिका (12) या तिघींनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. चमारीने 93 चेंडूंत 2 चौकारांसह 33 धावा केल्या, तर वीराकोड्डीने 32 चेंडूंत 3 चौकारांसह 26 धावांची खेळी करता आल्यामुळे त्यांचा डाव 98 धावांवर संपुष्टात आला. भारतीय महिलांकडून मानसी जोशीने 16 धावांत 3, झूलन गोस्वामीने 13 धावांत 2, तसेच पूनम यादवने 13 धावांत 2 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली.

संक्षिप्त धावफलक-
श्रीलंका महिला संघ- 35.1 षटकांत सर्वबाद 98 (चमारी अटापट्टू 33, श्रीपाली वीराकोड्डी 26, दिलानी सुरंगिका 12, मानसी जोशी 16-3, झूलन गोस्वामी 13-2, पूनम यादव 13-2) पराभूत विरुद्ध भारतीय महिला संघ- 19.5 षटकांत एक बाद 100 (स्मृती मंधाना नाबाद 73, पूनम राऊत 24, इनोका रणवीरा 5-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)