पहिलं पाऊल…

काही दिवसांपूर्वी “मांझी- The Mountain Man’ सिनेमा पहिला. सुस्तावलेल्या डोळ्यांत कुणीतरी अंजन घालावं असा अनुभव. दशरथ मांझी आणि पडद्यावर ही व्यक्तिरेखा साकारणारा नवाजुद्दिन सिद्दिकी या दोघांनाही सलाम ! आपल्यासमोरच्या आव्हानाला आव्हान देणारा, भल्यामोठ्या डोंगराला रोजच ललकारणारा मांझी खूप काही शिकवून गेला. इथून पुढे “अवघड आहे..!’ असं कोणत्याही गोष्टीबद्दल वाटलं तर मनात घर केलेला मांझी विचारेल – “पहाड तोडे से भी मुश्‍किल हैं का ?’ आजूबाजूची माणसं वेडा ठरवत असताना त्याचा आत्मविश्वास वाढवणारी कोणती गोष्ट होती त्याच्याकडे ? – त्यानं सुरु केलेलं, रोज थोड्या थोड्या प्रमाणात पूर्णत्वाकडे जाणारं त्याचं काम त्याला उभारी देत होतं. म्हणजे एका अर्थानं हा कामाचा पाठपुरावा होता.

आजकाल कर्मचाऱ्यांच्या कामाचा पाठपुरावा (follow -up ) घेण्यासाठी project management ची साधनं (tools ) वापरतात. अशाच एका tool मध्ये कामांची वर्गवारी To Do, Doing, आणि Done अशा याद्यांमध्ये (lists) मध्ये केली जाते. ज्याची To Do लिस्ट मोठी त्याच्याकडे Pending कामं जास्त असा त्याचं अर्थ. मला वाटतं- आपल्या रोजच्या चाकोरीच्या जगण्याव्यातिरिक्त अशा बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात ..किंवा कधीतरी कराव्या वाटलेल्या असतात. पण “छे ! जमेल का मला? ‘ म्हणून त्यांचा विचार सोडून दिलेला असतो किंवा ‘बघू,करू नंतर…’ असं म्हणत त्या अद्यापही करायच्या राहिलेल्या असतात.ही अलिखित To Do लिस्ट बऱ्याचदा खूप मोठी असते.

एका टीशर्टवर एक वाक्‍य वाचलं होतं – ‘I am just waiting for a better day’. बरेचदा चांगल्या दिवसाची वाट पाहत पाहतच आपली To Do लिस्ट मोठी होत जाते. अन मग whatsapp वर वाचून वाचून रटाळ वाटू लागलेला विनोद डिलीट करावा तशा काही गोष्टी मनातून पुसून टाकल्या जातात. आपल्याला सुचलेल्या एखाद्या सुंदर विचाराचं, सुखावणाऱ्या स्वप्नाचं, एखाद्या कल्पनेचं हे मरणच नव्हे का? तिला तिलांजली देण्यापेक्षा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडी धडपड केली तर? चांगल्या दिवसाची वाट पाहत बसण्यापेक्षा अशी सुरुवात करून वाटयाला आलेल्या दिवसांना चांगलं करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो आपण.

कदाचित काही गोष्टी पूर्ण होणार नाहीत. कधीकधी पावलांनी चाललेली वाट बदलावी लागेल..दुसरी वाट शोधावी लागेल. पण काहीतरी मिळेलच. कारण मी अमुक एक चांगली गोष्ट करून पहिली नाही याचं शल्य आयुष्यभर घेऊन जगण्यापेक्षा अपयशाची एखादी कथा मिरवणं कधीही चांगलं ! नाही का ? थोडक्‍यात काय, तर पुढचं पाऊल म्हणजे यशाची खूण असली तरी पहिलं पाऊल जास्त महत्वाचं..ते एकदा उचललं की पुढची पावलंही पडतील अन एखादी वाट चालता चालता दशरथ मांझीसारखं काहीतरी गवसेलही – “शानदार,जबरदस्त,जिंदाबाद !!!

– अमिता पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)