पसायदान म्हणजे विश्‍वसंस्कृतीशी जोडणारा सेतू

वारकरी संप्रदायाने समतेचा जागर केला -डॉ. मोरे
वारकरी संप्रदायाने स्त्री, शुद्र, अतिशुद्रांना आपल्यात सामवून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संत साहित्याचा अभ्यास केला कारण त्यांना देखील वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य आपले वाटले. समतेचा जागर वारकरी संप्रदायाने केला आणि जगाशी आपल्या विचारांची नाळ जोडली, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्‍त केले. श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभय टिळक आणि सचिन परब यांनी डॉ. सदानंद मोरे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीचे सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले.

साहित्य संमेलनातील दुसऱ्या सत्रात “पसायदानाची वैश्‍विकता’ या परिसंवादातील सूर

पुणे – पसायदान म्हणजे अतिउच्च अद्विताचे संक्रमण असून त्याच्या चिंतनातून आपल्याला शाश्‍वत आणि आत्मिक सुखाची प्राप्ती होते. पसायदान म्हणजे विश्‍वसंस्कृतीशी जोडणारा सेतू आहे, असा सूर “पसायदानाची वैश्‍विकता’ या परिसंवादात उमटला.
श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात “पसायदानाची वैश्‍विकता’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्‍वस्त, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी भूषविले. या परिसंवादात प्रा. वसंत आबाजी डहाके, डॉ. रजनी जोशी, प्रा. वैजनाथ महाजन सहभागी झाले होते.

अभय टिळक म्हणाले की, “जे खळांची व्यंकटी सांडो’ हा पसायदानाचा गाभा आहे. अगदी खोटे बोलण्यापासून ते दहशतवादापर्यंतच्या खल प्रवृत्तीवर ज्ञानोबांनी भाष्य केले आहे. तुमची बुद्धी सकारात्मक असेल तरच सुधारणा आणि प्रगती होते. पण खल प्रवृत्तीमुळे संतांना अहोरात्र झटण्याची भूमिका घ्यावी लागते. संघर्षाची भूमिका संतांकडे आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. वसंत आबाजी डहाके म्हणाले की, पसायदानाची रचना अतिशय सुंदर असून पुढच्या रचनेशी मागच्या रचनेची असलेली गुंफण अप्रतिम आहे. त्यामुळेच त्याचे शब्द मागे राहिले तरी त्याचा अर्थ स्मरणात राहतो. ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओव्यांनंतर पसायदान मागितले आहे. द्वैताचा म्हणजेच समाजातील वर्गवारीचा विनाश झाला पाहिजे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. अद्वैताचा स्पर्श झाल्याशिवाय मैत्र निर्माण होणार नाही आणि त्याशिवाय मनुष्याची उन्नती होणार नसल्याचे त्यांणी सांगितले.

डॉ. रजनी जोशी म्हणाल्या की, माऊलींना अहंकराविरहीत कर्म अभिप्रेत आहे. जगामध्ये असलेले आघात आणि कष्ट सोसण्याची ताकद संत देतात. समाजाला दिशा दाखवतात. पसायदानाच्या अभ्यासातून आत्मिक सुखाची प्राप्ती होते. पसायदान हे एक अतिउच्च तत्वज्ञान आहे. परिसंवादाचे सूत्रसंचालन सुनिताराजे पवार यांनी केले. प्रा. वैजनाथ महाराज म्हणाले की, योगशक्‍ती संपते तिथे भक्‍ती सुरू होते. त्या भक्‍तीचे दिव्यत्व पसायदानातून दिसते. याचा भावार्थ जगात पोहोचला पाहिजे. पसायदानामध्ये केवळ आकाशाला भिडण्याची ताकद नाही, तर आकाश व्यापून घेण्याची ताकद आहे. पसायदान हा या भूमीवरील पहिला आणि अंतिम शब्द असून त्याच्या प्रबोधन वर्गांची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)