पश्‍चिम मोसुल मधून 1 लाख 80 हजार लोक निर्वासित

बगदाद – इराकमधील मोसुल शहर इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून घेण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम मोसुल मधून सुमारे एक लाख 80 हजार नागरीकांनी तेथून अन्यत्र स्थलांतर केले असल्याची माहिती इराक सरकारच्या सूत्रांनी दिली. या सूत्रांनी सांगितले की या नागरीकांच्या सोयीसाठी जवळच्याच परिसरात 17 शिबीरे उघडण्यात आली आहेत. तेथे आत्ता पर्यंत 1 लाख 11 हजार नागरीकांनी आश्रय घेतला आहे. अन्य नागरीकांनी दुसऱ्या ठिकाणी पलायन केले आहे.
इराकी फौजांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी करून गेल्या 19 फेब्रुवारीपासून इस्लामिक स्टेटच्या गनिमांच्या विरोधात निर्णायक लढा सुरू केला आहे. इराकच्या बहुतांशी भागातून इस्लामिक स्टेटचा नायनाट झाला असून आता फक्त मोसुल शहरापुरते त्यांचे अस्तित्व उरले आहे. मोसुल शहराच्या पुर्वेकडील भागावर इराकी फौजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. आता थेट मोसुलवर कारवाई केली जाणार असून त्यामुळे आणखी काही निर्वासित तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आम्हीं अजून एक लाख निर्वासितांची सोय करू शकतो असे इराक सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या पथकांनीही तेथे मानवतावादी कार्य सुरू केले आहे. मोसुल परिसरातून 3 ते 3 लाख 20 हजार नागरीक विस्थपित होतील अशी शक्‍यता आम्हीं गृहीत धरली आहे असे या पथकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही त्यांच्या सोयीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली आहे असे संयुक्तराष्ट्रांच्या मानवतावादी मिशनच्या इराकच्या समन्वयक लाईस ग्रॅंड यांनी सांगितले. इस्लामिक स्टेटने कब्जा केला त्यावेळी मोसुलची लोकसंख्या सुमारे 20 लाख इतकी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)