पश्‍चिम महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे संकट

ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन पिक धोक्‍यात


हिवाळी अधिवेशनात उपस्थित होणार कळीचा मुद्दा

कोल्हापूर – जोरदार पावसाने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पाणीच पाणी झाले आहे. दोन-अडीच महिने धो-धो बरसणाऱ्या संततधार पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सुमारे 16 तालुक्‍यांत ओल्या दुष्काळाचे संकट उद्भवले आहे.

ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांना धोका निर्माण झाला असून पीक हातून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला जोर धरला असताना कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निकषाबाबत एकवाक्‍यता नसल्याने पंचनामे करण्यात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे नवा वाद निर्माण होत आहे. हा विषय राजकीय वादाला खतपाणी घालण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशनात ओला दुष्काळ सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

कोल्हापुरसह पश्‍चिम महाराष्ट्राच्या पश्‍चिमेकडील भागात दरवर्षी मुबलक पाऊस असतो. यंदा तर पावसाचा मुक्काम अंमळ अधिक आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अपवाद वगळता रोजच पाऊस पडत आहे.यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भूदरगड, आजरा, कागल, चंदगड, शाहूवाडी, गडहिंग्लज असे 10, सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, वाई या पाच तालुक्‍यांतून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

यंदा होत असलेल्या अतिवृष्टीने पिके उद्‌वस्त झाली आहेत. ढगाळ हवामान, सततचा पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहेत. खात्रीच्या ऊस पिकासह भात, सोयाबीन, नाचणी, भुईमूग पिके धोक्‍यात आली आहेत. पावसाने शेतातील ओलावा कायम असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऊसावर करपा, तांबेरा, हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीकाठच्या बुडीत क्षेत्राची परिस्थिती तर आणखीनच गंभीर आहे.

यंदा पावसाची संततदार कायम आहे, हे वास्तव लोकप्रतिनिधीपासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण मान्य करत आहेत. मात्र अद्याप शासकीय यंत्रणा ओला दुष्काळ असल्याचे कबूल करत नाहीत. त्यातच ओल्या दुष्काळाचे परिपूर्ण निकष नसल्याचे कोल्हापूर आपत्ती निवारण कक्षाचे म्हणणे आहे. याबाबतीत कृषी विभाग महसूल विभागाकडे बोट दाखवत आहे. हा विभाग उत्तर देण्याऐवजी थेट पंचनामा करण्यासाठी बाहेर पडला आहे. पंचनाम्याची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर ओल्या दुष्काळावर बोलता येईल, असा शासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन आहे. पावसाचा मुक्काम कायम असल्याने ऊस, सोयाबीनचे नुकसान झाल्याचे कृषी सहसंचालक कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले.

आकडयांचा घोळ
कोल्हापूर जिल्ह्याच्या सरासरीच्या प्रमाणात मात्र तो कमी असल्याचे आकडेवारीकडे नजर टाकल्यास दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी 1772 मिलीमीटर इतकी आहे. यंदा पावसाचा एक महिना शिल्लक असला तरी आजवर 1432 मिमी पाऊस पडला आहे. जुलैची सरासरी 757 मिमी असून पडलेला पाऊस 738 मिमी आहे. जूनची सरासरी 337 मिमी असून 290 मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 477 मिमी सरासरीच्या तुलनेत 393 मिमी पाऊस पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)