पशुधनाची होणारी परवड कधी थांबणार

वाळून गेलेल्या गवतातून चारा शोधताना जनावरे 

टंचाईमुळे दुष्काळी पट्ट्यातील पशुलपालकांचे स्थलांतर सुरू

नागनाथ डोंबे
म्हसवड, दि.13 – लांबच्या लांबवर दिसणारी कुसळे, डोंगर कपारीने बोरी व बाभळीच्या पानांवर ताव मारणाऱ्या शेळ्यामेंढ्या, त्यांचे वन्य प्राण्यांपासून राखण करणारी पाळीव कुत्री, तालुक्‍यातील दुष्काळी पट्ट्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, गतवर्षी पाऊस नव्हता. पाऊस पडेल या आशेवर आजपर्यंत विकत चारा घेऊन जनावरे जोपासली, मात्र चाऱ्याची किंमत जनावरांपेक्षा जास्त होऊ लागल्याने पशूपालक हतबल झाला. दुष्काळाच्या तीव्रतेमुळे अनेक भागातील पशुधनाची विक्रीसाठी बाजारात आवक वाढल्याने कवडीमोल किंमतीला विकावे लागत आहेत. या भागातील घटती पशुधनाची संख्या आता धोक्‍याची पातळी ओलांडत असून येथील शेतकऱ्याला हे पशुधन पुन्हा मिळवण्यासाठी अनेक वर्ष झगडावे लागणार आहे.
माण तालुक्‍यातील तालुक्‍यातील कुकूडवाड, वडजल, दिवड, जांभुळणी, विरळी, वळई, पुळकोटी, काळचौंडी, पळसावडे, हिंगणी धुळदेव पर्यंती, कारखेल, इंजबाव, संभुखेड आदी
गावांचा दुष्काळी पट्टा अनेक संकटांना तोंड देत आहे. या पट्ट्यात झालेली शेतीची वाताहत पाहता शेतकऱ्यांना शेळी-मेंढी पालन व देशी गाई पालन यावर गुजराण करावी लागत आहे. सध्या चारा व पाणी टंचाई सामोरे जाताना दररोज शेकडो रुपये खर्च करून चारा आणावा लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च त्यांच्या किंमतीपेक्षा अधिक होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. या भागातील काही पशुधन स्थलांतरित झाले आहे. अनेक जनावरे छावणीत दाखल झाली आहेत. उर्वरित पशुधनासाठी सध्या तर बऱ्याच ठिकाणचे पशुधन विक्रीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. गाई नातेवाईकांना वाटाव्या लागत आहेत. एकुणच पशुधन कवडीमोलाने विकावे लागत आहे. भविष्यात उभा राहताना पुन्हा हे पशुधन मिळवणे अवघड बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशासनाकडून दुष्काळी पट्ट्याची थट्टाच
प्रशास पशुधनासाठी वेगवेगळ्या योजना अमलात आणत आहे. पशुधना बाबतीतल्या योजनांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखविला जात असला तरी या दुष्काळी पट्ट्यातील गावातील पशुधन वाचवताना शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड पाहता कोट्यवधीचा खर्च कुठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे. चाऱ्यासाठी प्रशासनाने बियाणे वाटप केले, मात्र या पट्ट्यातील परिस्थिती वेगळी आहे. गेल्या हंगामात ज्वारीची पेरणी नगण्य आहे, पेरलेली पिके गुडघाभर येऊन जळताना दिसत आहेत. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही तर चाऱ्याच्या बियाणे वाटपाचा या भागाला काय फायदा होणार यासाठी प्रशासनाने चारा छावणी सुरू करण्याबाबत धोरण असले तरच या भागातील पशुधन वाचू शकते.

पाऊस पडेल या आशेवर परवडत नसतानाही चारा विकत घेवून पशूधन जगवत आहे. यापुढे हे शक्‍य होईना झाले आहे. हेच पशुधन पाऊस पडल्यानंतर घेताना दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. निसर्ग कोपलाय अन्‌ सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे या पट्टयातील पशुधन अखेरची घटका मोजत आहेत.
सोमनाथ कवी, शेतकरी

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)