पवित्र पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

राज्यातील आठ विभागात मदत कक्ष सुरु; उमेदवारांची गर्दी

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी व इतर अडचणी सोडविण्यासाठी 8 विभागीय उपसचांलक कार्यालय स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवित्र पोर्टलवर 1 लाख, 23 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. या नोंदणीसाठी उमेदवारांना अनेकदा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, या मुदतवाढीत काही उमेदवारांनी प्रोफाईल अद्ययावत केलेच नसल्याचे आढळले आहे. या उमेदवारांनी प्रोफाईल अद्ययावत करण्याची संधी मिळावी, अशी मागणी शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्याकडे केली होती. आयुक्‍तांनी त्याची दखल घेत मदत कक्ष तत्काळ सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, अमरावती, मुंबई या 8 ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या मदत कक्षांबाबतची माहिती शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरही नमूद करण्यात आली आहे.

उमेदवारांना ड्राफ्ट कॉपीत बदल करणे, प्रवर्ग बदलणे, नॉन क्रिमिलेयरची माहिती अद्ययावत करणे, अर्ज स्वप्रमाणित करणे, अर्जात बदल करून प्रिंट काढणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना मदत कक्षातून कार्यालयीन वेळेतच करता येणार आहे.

प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज, त्यांचे मूळ आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र या आवश्‍यक कागदपत्रासह मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. संबंधित उमेदवारास फक्‍त एकदाच पवित्र पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे. यानंतर माहितीत दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा मुुदतवाढ मिळणार नाही, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विभागासाठी समग्र शिक्षा अभियान कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी उमेदवारांची खूप गर्दी होऊ लागल्याने व उमेदवारांचे कार्यालयात सतत दूरध्वनी येऊ लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणचा कक्ष आता पुणे कॅम्पमधील आझम कॅम्पसमध्ये हलविण्यात आला आहे. या केंद्रांवरील उमेदवारांची गर्दी लागली आहे. कार्यालयीन वेळेनंतर थांबून कर्मचारी उमेदवारांची कामे पूर्ण करत असल्याचेही समजले आहे.

उमेदवारांच्या अडचणी सोडविण्यात येतील
पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी शेवटीची संधी देण्याच्या दृष्टीकोनातून विभागनिहाय मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रावर उमेदवारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. उमेदवारांची सर्वच केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. मदत कक्षांवर आवश्‍यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)