पवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून

गोरेंच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला ; जे पेरले तेच उगवल्याची चर्चा

प्रशांत जाधव

माढ्यातून कोण लढणार, माढ्यात नेमके काय होणार याचीच चर्चा राज्यात असतानाच शुक्रवारी मात्र जरा भलतेच इपरीत घडले. शरद पवारांचा दावा असलेल्या माढ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजयाचे गणीत मांडत असतानाच पवार साहेबांच्या साक्षीने त्यांच्याच माढा लोकसभा मतदार संघात गटबाजीचा अपशकुन झाला. माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी संधीचे सोने करत चक्क पवारसाहेबांच्या समोरच राडा प्रदर्शन केले. त्यामुळे पवार साहेब सावध ओळखा काळाच्या पाऊल खुणा असा राग राष्ट्रवादीच्या एका गटात आळवला जात आहे.

फलटणमध्ये शुक्रवारी काय घडले यापेक्षा कसे घडले हे महत्वाचे आहे. देशाच्या राजकारणात पवारसाहेबांच्या शब्दाला असलेली किंमत पाहता राष्ट्रवादीचा कोणी नेता अथवा कार्यकर्ता त्यांच्या समोर पक्षविरोधी काही बोलेल असे वातावरण नाही. मग तरीही पवार साहेब वेळोवेळी शांत बसण्याचे आदेश देत असतानाही शेखर गोरेंचे कार्यकर्ते शांत न बसण्यामागचे कारण खुद्द पवारसाहेबांनाही माहित असावे. कार्यकर्त्यांचे ठिक असले तरी शेखर गोरेंच्या हाताला धरून साहेब समजावत असतानाही गोरेंनी पाया पडतो पण आता तुम्हीच माझे ऐका अशी विनंती साहेंबाना केली.

त्यामुळे राष्ट्रवादी अन् शेखर गोरे यांच्यातील सख्य किती आहे. हे खुद्द साहेबांनीच समजुन घ्यायला हवे. राष्ट्रवादीचे माण तालुक्यातील नेते स्व.पोळ तात्यांनी किंगमेकर म्हणून राज्यात लौकीक मिळवला होता. तालुक्यात एकही सत्तास्थान असे नव्हते तिथे तात्यांची सत्ता नव्हती. पण काळ बदलला, जुन्या राजकारणाची समिकरणे नव्या कार्यकर्त्यांना पसंद येत नव्हती. त्यातच खुद्द बारामतीकरांच्या आदेशाने तात्यांना पर्याय म्हणून अनिल देसाईंना पक्षात सक्रीय केले गेले. देसाईंना जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा महत्वपुर्ण ठिकाणी पदे दिली होती.

पवारांच्या या खेळीने तात्यांनाही वेदना झाल्या होत्याच. मात्र पवारांशी असलेला जुना स्नेह अन् तात्यांचे झालेले वय तात्यांच्या बंडखोरीला आडवे येत होते. मात्र तात्यांच्या याच अडचणीला पवारांनी आपले यश मानल्याचे काही कार्यकर्ते खासगीत सांगतात. त्यानंतर देसाई – पोळ या गटाच्या अंतर्गत वादात काय झाले याला इतिहास साक्षीदार आहेच. दरम्यानच्या काळात आमदार जयकुमार गोरे यांचे माण तालुक्यातील वाढते प्रस्त राष्ट्रवादीला सहन होईनासे झाले होते. साहेब अन् जिल्ह्यातील नेते जयकुमार यांना रोखणार्‍या नेत्याच्या शोधात होते.

त्याचवेळी लोहा लोहे को काटता है असे म्हणत शेखर गोरेंना वाजत गाजत विधानपरिषदेची उमेद्वारी जाहीर करून पक्षात आणले. शेखर गोरेंनी पुर्ण ताकदीने जयकुमार गोरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. म्हसवड पालिकेसह तालुक्यातील बहुतेक सत्तास्थाने त्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली. पण जयकुमार गोरेंचा पतंग काटण्यासाठी पक्षात आणलेल्या शेखर गोरे नावाच्या लोह्याची धग राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील नेत्यांना हळुहळू बसू लागली होती. काहीही झाले तरी आमदार व्हायचे या निर्धाराने झापटलेल्या शेखर गोरेंनी माझ्या तालुक्यातील निर्णय मीच घेणार असे जिल्ह्यातील नेतेमंडळीना ठणकावले होते.

त्यामुळे गोरे कुणाचेच ऐकत नसल्याचा संदेश थेट पवारसाहेबांच्या कानी गेला होता. पण पर्यायी चेहरा नसल्याने काही काळ सहन करा असा सबुरीचा सल्ला नेतेमंडळीना दिला होता. त्यानंतर प्रभाकर देशमुख यांच्या राजकारणात येण्याची चिन्हे बारामतीतूनच स्पष्ट झाल्याने शेखर गोरेंच्या गटाला मोठा धक्का बसला होता. गोरे यांनी वेळोवेळी पवारसाहेबांना भेटण्यासाठी वेळ मागुनही तब्बल दीड वर्षे त्यांना ती मिळाली नसल्याची खंत त्यांच्या कार्यकर्त्यांना असल्यानेच त्यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावल्यानंतर देशमुख लोकसभेच्या रिंगणात असतील असा संदेश बारामतीतूनच पास झाला. मात्र या संदेशाचे बुमरँग झाले, बबन मामा,विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मनात चलबिचल सुरू झाल्याचे लक्षात येताच साहेबांनी पुन्हा माढ्यात आपणच असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे देशमुख पुन्हा आपल्याला स्पर्धक असल्याची जाणीव शेखर गोरेना झाल्यानेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील संघर्षाचा इतिहास सांगत सत्ता कशी काबीज केली याच्या गोडव्यांसोबतच पवार साहेबांच्या माढ्याला गटबाजीचा अपशकून असल्याचे संकेत दिले आहेत.

————————————————————————————————
साहेब काळ बदललाय….
पवार साहेब म्हणजे देशातील धुर्त राजकारणी कोणत्या पटावर कोणता डाव खेळायचा यात त्यांचा हातखंडा आहे. माण तालुक्यातील राजकारणात प्रथम पोळ तात्यांना पर्याय म्हणून अनिल देसाई यांना उभे करण्यात आले. मात्र तात्यांनी निष्ठेच्या ओव्या तोंडपाठ असल्याने त्या निर्णयाला उघड विरोध केला नाही. मात्र शेखर गोरेंना प्रभाकर देशमुख हा पर्याय दिल्यानेच गोरेंनी बंडाचे निशान फडकवले आहे. तुम्ही नुसत्या डोळ्यांनी खुनावले तर काम तमाम होणार्‍या तुमच्या पक्षात तुमच्या समोरच बंड केले जात आहेत. यावरून काळ बदललाय हेच स्पष्ट होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)