पवार, ममता ऐकतील ?

कॉंग्रेसने राहुल गांधी यांना त्वरीत पक्षाध्यक्ष करून एव्हाना त्यांच्या नेतृत्वाला पुर्ण मोकळीक देणे अपेक्षित होते, पण पराभवाचे एकामागून एक धक्के बसल्याने पक्ष अजून त्यांच्याकडे पुर्ण सूत्रे देण्यास धजावत नाही. पण तरीही त्यांना फार काळ अधांतरी ठेवूनही चालणार नाही. त्यामुळे अन्य नेत्यांना एकीची हाक देण्याआधी पक्षात काही मुलभूत सुधारणा करण्यासाठी कॉंग्रेसला काही हालचाली कराव्या लागतील.
कॉंग्रेसच्या पुर्नबांधणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींकडे जाणार की पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात ती सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार याविषयीही काही अटकळी बांधल्या जात आहेत. तशातच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते पी. के. थॉमस यांनी कॉंग्रेस परिवारातील जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार, आंध्रातील वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन यांना आपआपले पक्ष विसर्जित करून कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पुर्वीच्या जनता पार्टी परिवारातील पक्षांसारखी सध्या कॉंग्रेसची अवस्था झाली आहे. जनता परिवारातील पक्षांच्या नेत्यांनाही अधुनमधून एकीकरणाची स्वप्ने पडतात. एखाद्या नेत्याच्या घरी बैठकांचे सत्र सुरूही होते पण मग नंतर एकीकृत पक्षाचे नेतृत्व कोणी करायचे यावरून पुन्हा वितंडवाद सुरू होतो आणि हा विषय मागे पडतो. जनता परिवारही तसा मजबुत राजकीय परिवार आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष, ओडिशात बिजू जनतादल, बिहारमध्ये संयुक्त जनता दल, कर्नाटकात जनता दल सेक्‍युलर अशा घटकांमध्ये ही ताकद विखुरली गेली आहे. त्याच्या एकत्रिकरणाने मोठा सक्षम राजकीय पर्याय उभा राहु शकतो ही वस्तुस्थिती असताना हे पक्ष मात्र एक येऊ शकत नाहीत. त्यामुळे थॉमस यांनी मोठ्या मनाने कॉंग्रेसच्या गटांना एकत्रित येण्याचे आवाहन केले असले तरी या एकीकरणाने कॉंग्रेस परिवारातील अन्य पक्षांना लाभ होण्याची शक्‍यता नसल्याने त्यांना या एकीकरणाच्या प्रक्रियेत स्वारस्य निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. तृणमुल कॉंग्रेसचे पश्‍चिम बंगालमध्ये मोठे अस्तित्व आहे. तेथे त्यांना नजिकच्या भविष्य काळात तरी भाजपचा धोका उद्‌भवण्याची शक्‍यता नाही कारण भाजपचे त्या राज्यात अस्तित्वच नाही. त्यामुळे मोठ्या कष्टाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या ममता बॅनर्जी कॉंग्रेसमध्ये आपला पक्ष विलिन करण्याची सूतराम शक्‍यता नाही. आंध्रातही कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. तेथही भाजपचा धोका नाही अशा स्थितीत आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन करण्याने जगनमोहन यांनाही फार लाभ होण्याची शक्‍यता नाही. इकडे महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये विलीन न होताही कॉंग्रेसच्या राजकीय अस्तित्वाचा पवारांनी चांगला उपयोग करून घेतला आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस त्यांनी आपली बटिक बनवली असल्याचे चित्र बऱ्याच वेळा दिसले आहे. शिवाय स्थानिक पातळ्यांवर कॉंग्रेसखेरीज भाजप, शिवसेना अशा कोणत्याही पक्षांशी हातमिळवणी करून सत्ता मिळवण्याची लवचिकता पवारांनी सातत्याने दाखवली आहे. केंद्रात किंवा राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आली की पवार त्यांच्या सरकारमध्येही सामील असतातच. अन्यवेळी ते मोदी व भाजपशीही सलगी करून असतात. कॉंग्रेस मध्ये आपला पक्ष विलीन केल्यानंतर पवारांना असा दुहेरी लाभ घेण्याची शक्‍यता मावळते त्यामुळे तेही थॉमस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील असे वाटत नाही. शिवाय आयत्यावेळी सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेस परिवारातील या तिन्ही पक्षांनी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवलेला असतोच. मुळात कॉंग्रेसपासून दुरावेल्या या नेत्यांनी स्वतःच्या ताकदीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले असताना ते अशा आवाहनांना धूप घालण्याची शक्‍यता कमी आहे. कॉंग्रेसची सध्याची अवस्था अत्यंत भीषण झाली असली तरी पक्षाच्या कार्यपद्धतीत काही सुधारणा करण्याच्या हालचाली मात्र अजूनही होताना दिसत नाहीत. पक्षाला काही नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न राहुल गांधींकडून मधल्या काळात झाला होता पण त्याला फार अनुकुल प्रतिसाद लाभलेला दिसला नाही. कॉंग्रेसने राहुल गांधी यांना त्वरीत पक्षाध्यक्ष करून एव्हाना त्यांच्या नेतृत्वाला पुर्ण मोकळीक देणे अपेक्षित होते, पण पराभवाचे एकामागून एक धक्के बसल्याने पक्ष अजून त्यांच्याकडे पुर्ण सूत्रे देण्यास धजावत नाही. पण तरीही त्यांना फार काळ अधांतरी ठेवूनही चालणार नाही. त्यामुळे अन्य नेत्यांना एकीची हाक देण्याआधी पक्षात काही मुलभूत सुधारणा करण्यासाठी कॉंग्रेसला काही हालचाली कराव्या लागतील. त्यातून आशादायी चित्र निर्माण झाले तरच कॉंग्रेसबरोबर जाण्यात ही मंडळी स्वारस्य दाखवतील. अन्यथा सर्वच पातळ्यांवर घराणेशाहीची परंपरा जपणाऱ्या या स्थितीवादी पक्षाला इतक्‍यात बरे दिवस येण्याची शक्‍यता दिसत नाही. आपल्याच परिवारातील जुन्या नेत्यांना विलिनीकरणाचे आवाहन करण्याच्या किंवा अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याच्याही आधी कॉंग्रेसला आपले घर सावरावे लागणार आहे. पक्षात नवीन कार्यकर्ता येण्याची प्रक्रिया थांबली आहे. पक्षात सध्या कार्यरत असलेले अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना थांबून ठेऊन त्यांच्यात विश्‍वास निर्माण करण्याचे काम कॉंग्रेसला आधी करावे लागेल. निवांतपणाच्या किंवा स्थितीवादी मानसिकतेतून पक्ष बाहेर येत असल्याचे वातावरण कॉंग्रेसला निर्माण करावे लागेल. तसे झाले तर पक्षापासून दूर गेलेली मंडळी आपोआप पुन्हा पक्षात परततील. अन्यथा स्वतःचे घर दुरूस्त करण्याआधीच दुसऱ्यांना आमंत्रण देण्याचा काही उपयोग नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)