पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

सातारा – भाजप सरकारने अल्पकालावधीत शेतकऱ्यांसाठी दिलेला मदतीचा हात पाहता सर्वाधिक कालावधीसाठी जे देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खा.शरद पवार यांच्यावर केली. पंतप्रधानांनी रविवारी साताऱ्यासह चार लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अप्रत्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

यावेळी ते म्हणाले, कॉंग्रेस सरकारच्या मागील 15 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषी विम्यासाठी 450 कोटी रूपये भरले होते. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना एक हजार चारशे कोटी रूपये मिळाले. मात्र, भाजपच्या प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला. विमा योजनेत शेतकऱ्यांनी एक हजार सहाशे कोटी रूपये भरले. तर त्या मोबदल्यात बारा हजार रूपये कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसने मागील 15 वर्षात हमीभावाने केवळ 450 कोटी रूपयांचे धान्य खरेदी केले तर भाजप सरकारने केवळ चार वर्षात आठ हजार पाचशे रूपयांचे धान्य खरेदी केले. असे सांगून मोदी यांनी हा बदल नाही तर काय आहे आणि कुठे 15 वर्ष आणि कुठे चार वर्ष, असा प्रश्‍न उपस्थित केला.

पुढे बोलताना त्यांनी जे शेतकऱ्यांचे नेते बनू पहात आहेत आणि जे बराच काळ देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला हवे अशी टीका शरद पवारांवर केली.

मोदी म्हणाले, दोन वर्षापुर्वी साखरेचे भाव कोसळल्यामुळे ऊसाला दर मिळत नव्हता. म्हणून ऊसाच्या आणि साखरेच्या बाबतीत दर निश्‍चित केले. यंदाच्या वर्षी ही ऊसाचे उत्पन्न देशभरात वाढले आहे. त्याचा परिणाम शेतकरी आणि कारखान्यावर होणार असल्याचे निदर्शनास येताच साखर निर्यातीसाठी कारखान्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांची पुर्ण देणी दिली तरच हे अनुदान दिले जाणार आहे. साखरेबरोबर इथेनॉल निर्मिती व्हावी यासाठी देखील सरकार मदत करत आहे. तसेच यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस कमी झाला. त्यामुळे दुष्काळ निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत राज्याच्या खांद्याला खांदा लावून केंद्रातून केली जाईल.

माढा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सदानंद ठेंगे यांनी नुकतेच केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या मागास समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधक हे आरक्षण आगामी निवडणूक समोर ठेवून दिले असल्याचा आरोप करित असल्याचे ठेंगे यांनी सांगितले. तसेच आरक्षणासाठी आठ लाख रूपये उत्पन्नाची मर्यादा आणि विद्यालयांमध्ये जागा कमी असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले. त्यावर मोदी म्हणाले, आरक्षण देण्याचा निर्णय संविधानाचे संशोधन करून घेण्यात आला आहे. केवळ 48 तासांच्या आत हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले. त्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. त्यांच्याकडून खोटे बोलणे व अफवा पसरवण्याचे काम होतच राहिल. मात्र, सबका साथ सबका विकास घोषणेप्रमाणे दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसने सामाजिक न्याय देण्यासाठी काही केले नाही. निवडणूका समोर ठेवून निर्णय घेण्याबाबत मोदी म्हणाले, देशात वर्षभर निवडणूका या होतच असतात. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूका तसेच त्या अगोदर कर्नाटक आणि गुजरात होत्या. सर्व निवडणूका पाहता निर्णय कधी घेणार तरी कधी, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)