पवारांनी पुण्याला खूप काही दिलं; मात्र पुण्याने पवारांना कधी स्वीकारले नसल्याची खंत

“पुणे एके काळी…’ कॉफीटेबल बुकचे उद्‌घाटन

आणि उलगडला शरद पवार-श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीचा प्रवाह

-Ads-

पुणे – ” तासन्‌तास बसून राजकारण, साहित्य विषयांवर केलेल्या चर्चा…रात्री दीड-दोन वाजता मंडईत केलेली कामे…पुण्यातील खाद्यभ्रंमती…राजकारण, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी, त्याचबरोबर महाविद्यालयीन निवडणुकीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत मजल याबाबतची जडण-घडण आणि गेली 60 वर्षे अविरतपणे वाहणाऱ्या शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीचा प्रवाह…अशा अनेक अनुभवांची मजेशीर किश्‍श्‍यांच्या माध्यमातून उलगडणारी शिदोरी पुणेकरांनी रविवारी अनुभवली.

“पेपरलीफ’ संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्याच्या शंभर नव्या जुन्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या “स्मरणरम्य पुणे’ या दिनदर्शिकेचे तसेच “पुणे एके काळी…’ या कॉफीटेबल बुकचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी इतिहास अभ्यासक मंदार लवाटे, संस्थेचे संस्थापक जतिन भाटवडेकर उपस्थित होते. याप्रसंगी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मुलाखत घेतली.

पवार म्हणाले, “पुण्यातील वास्तव्याच्या काळ हा माझ्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. यादरम्यान अनेक ऐतिहासिक वास्तू, दिग्गज कलावंत, साहित्यिक, राजकारणी यांना प्रत्यक्ष भेटता आले. याच पुण्यात नरहर गणपत पवार या वास्तूविशारदांनी स.प. महाविद्यालय, गोखले सभागृह, प्रभात टॉकिज, एफटीआयआय यासारख्या अनेक वास्तू बांधल्या. पवारांनी पुण्याला खूप काही दिलं, मात्र पुण्याने पवारांना कधी स्वीकारले नाही, अशी खंतही पवार यांनी बोलून दाखविली.

…. आणि 34 वर्षांनंतर पाटील राजकारणात आले
श्रीनिवास पाटील यांचं गाव कराड. त्यावेळी यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते कराडमध्ये असल्याने पाटील यांना संधी मिळण्याची शक्‍यता कमी होती. त्यामुळे त्यांनी एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी पवार यांनी त्यांच्याकडून “मी ज्या दिवशी सांगेल, त्या दिवशी राजीनामा द्यायचा’ अशी कमिटमेन्ट घेतली. त्यानंतर श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत रूजू झाले. दरम्यान, कॉंग्रेसशी मतभेद झाल्यानंतर पवार यांनी वेगळा पक्ष काढला त्यावेळी कराडसाठी उमेदवार कोण? असा प्रश्‍न त्यांना पडला. पवार यांनी पाटील यांना मुंबईला बोलावून घेत “मंत्रालयात जा आणि राजीनामा देऊन ये’ असं सांगितलं. राजीनामा देऊन आल्यानंतर त्यांना कराडला जाऊन फॉर्म भरायला सांगितलं. श्रीनिवास पाटील यांनी फॉर्म भरला आणि साडेतीन लाख मतांनी लोकसभेवर निवडून आले. अशाप्रकारे सुमारे 34 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर पाटील राजकारणात आले.

पुणेकरांनी गदिमांना न्याय दिला नाही

ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशाताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणी पवार यांनी सांगितल्या. गदिमा यांच्यासारखे व्यक्तिमत्व इतकी वर्षे पुण्यात वास्तव्यास होते. या थोर साहित्यिकाने आपल्या लेखणीतून साहित्याच्या संपन्नतेत मोलाची भर टाकली. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच बारामतीमध्ये त्यांच्या नावाने भव्य सभागृह उभारले. मात्र, पुण्यात गदिमांचे एकही स्मारक नाही. पुण्याने गदिमांसोबत न्याय केला नसल्याची खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

What is your reaction?
9 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. फारश्या प्रतिक्रिया दिसत नाहीत या वरूनच ओळखा. जिथे कलमाडी व मोरे उलटले तिथे बाकीचे पुणेकर त्यांना काय विचारणार. स्वार्था पोटी काम केल्यास त्याची किंमत केली जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)