पवारांचा निर्णय मान्य,मात्र माझेही इतर पक्षात मित्र

खा.उदयनराजेंचा सूचक इशारा
सातारा,दि.7 प्रतिनिधी- माझ्या उमेदवारीला विरोध असला तरी विरोध करणाऱ्यांची ताकद किती हे समजून घ्यायला हवे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आणि पाठिंबा देणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पवार साहेबांनी आढावा घेतला आहे.ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल मात्र, पवार साहेबांप्रमाणे आपलेही इतर पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशारा खा.उदयनराजे यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई येथील बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा सपंल्यानंतर खा.उदयनराजे पोहचले. कार्यालयाचा पत्ता माहित नसल्याने व वाहतूक कोंडीचे कारण देवून येण्यास उशिर झाला असल्याचे यावेळी खा.उदयनराजे यांनी सांगितले. पुढे बोलताना खा.उदयनराजे म्हणाले, मागील निवडणुकीतील माझे मताधिक्‍य कोण तोडणार असेल तर आपण माघार घेण्यास तयार आहोत. मात्र, जे आपल्या नावाला विरोध करित आहेत त्यांची ताकद समजून घेणे गरजेचे आहे.
उदयनराजे म्हणाले की, सातारा मतदार संघाच्या बैठकीची मी फोन वरून माहिती घेतली आहे. माझ्या नावाला काही लोकांनी विरोध केला आहे. विरोध झाला तरी मी सातारा मतदार संघासाठी इच्छुक आहे.कोणाचाही विरोध असला तरी मी सातारा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.
बैठकीत उदयनराजे यांच्या उमेदवारीला झालेल्या विरोधाबद्दल विचारले असता माझ्यावर काही लोकांचे खूपच प्रेम असल्याचे दिसतंय अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
भाजपसोबत जवळीक वाढत असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता,उदयनराजे म्हणाले,जशी पवार साहेबांची अन्य पक्षात मैत्री आहे, तशीच माझी ही अन्य पक्षात मैत्री आहे.
दरम्यान खा.उदयनराजे यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत खा.उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध झाला असला तरी वाई पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी यांनी खा.उदयनराजे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली.

शरद पवारांची भेट घेतली
उदयनराजे यांनी पक्ष कार्यलयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. पवार साहेबांना मी माझी भूमिका सांगितली. साहेब पुढच्या काही दिवसात साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी स्थानिक आमदार यांच्यासोबत कार्यकर्त्यांशीही साहेब बोलणार असून त्यानंतर पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)