पलानीस्वामी, शशिकला यांची पन्नीरसेल्वम गटाकडून हकालपट्टी

अण्णाद्रमुकमधील संघर्ष कायम
चेन्नई – तामीळनाडूच्या सत्तारूढ अण्णाद्रमुकमधील पक्षांतर्गत संघर्ष कायम आहे. माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील गटाने आज थेट नवे मुख्यमंत्री ईडाप्पडी के.पलानीस्वामी आणि सरचिटणीस शशिकला यांच्यासह 16 बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. विशेष म्हणजे, पलानीस्वामी यांच्या शक्तिपरीक्षेच्या आदल्या दिवशी ही घटना घडली.
तुरूंगात रवानगी झालेल्या शशिकला यांच्याविरोधातील लढा चालू ठेवण्याचा निर्धार पन्नीरसेल्वम यांनी बोलून दाखवला आहे. त्यानुसार पाऊले उचलताना शशिकला, त्यांचे दोन नातलग, पलानीस्वामी आणि इतरांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून हटवण्यात आले. अण्णाद्रमुकची तत्वे आणि आदर्शांविरोधात जाऊन पक्षप्रतिमेची हानी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. शशिकला यांनी राजकारणात सक्रिय होणार नाही, असे वचन अम्मांना (दिवंगत जयललिता) दिले होते. मात्र, वचनभंग केल्याबद्दल शशिकला यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पन्नीरसेल्वम गटाने म्हटले आहे.
पन्नीरसेल्वम यांच्या गटात असणाऱ्या ई.मधुसुदनन यांना काही दिवसांपूर्वी शशिकला यांनी अण्णाद्रमुकमधील दुसऱ्या क्रमांकाचे पद असणाऱ्या प्रिसिडिअम पदावरून हटवले. त्या कारवाईला जशास तसे उत्तर म्हणून पन्नीरसेल्वम गटाने उचललेल्या पाऊलाकडे पाहिले जात आहे. अर्थात, शशिकला यांना अधिकार नसल्याचे सांगत पन्नीरसेल्वम गटाने मधुसुदनन यांच्यावरील कारवाई अमान्य केली. आता पन्नीरसेल्वम गटाने उचललेले पाऊलही पलानीस्वामी, शशिकला गटाकडून झिडकारले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या ताब्यावरून दोन्ही गटांतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. पन्नीरसेल्वम गटाने कालच शशिकला यांच्या सरचिटणीसपदावरील निवडीला आव्हान देत निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले. उत्तरप्रदेशच्या सत्तारूढ समाजवादी पक्षावरील ताब्यावरून काही दिवसांपूर्वी जोरदार यादवी रंगली. तसेच चित्र तामीळनाडूत पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)