पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेचे पुढचे पाऊल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पालिका सकारात्मक पावले उचलत आहे. त्यातून तब्बल 856 किलोवॅट वीज निर्मिती करून पर्यावरण संवर्धनासह आर्थिक बचतीसाठी महापालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. तर आगामी काळात सौरऊर्जेतून वीजनिर्मिती करण्यासाठी स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत वीजनिर्मितीसाठीच्या धोरणालाही पालिकेने मंजुरी दिली आहे.

पालिका भवनाच्या इमारतीवर 50 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यातून दररोज 160 ते 250 युनिट वीजनिर्मिती होत आहे. ही वीज महावितरणाच्या नेट मीटरिंगने जोडली असून, त्यातून वीज बिलात बचत होत आहे; तसेच इ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवर 11 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू आहे.
आगामी काळात पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने कासारवाडी, पिंपळे निलख, चिखली येथील मैला सांडपाणी शुद्धिकरण केंद्राच्या इमारतीवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहे.

कासारवाडी केंद्रातून 45 किलोवॅट, पिंपळे निलख केंद्रातून 10 किलोवॅट आणि चिखलीच्या केंद्रातून 25 किलोवॅट असे एकूण 85 किलोवॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पालिका 66 लाख 37 हजार रुपये खर्च करीत असून, त्यास स्थायी समितीने 11 सप्टेंबरला मंजुरी दिली आहे. पालिकेच्या वतीने विविध 17 इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पातून एकूण 251 किलोवॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एकूण 1 कोटी 89 लाख 34 हजार 270 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत वीज निर्मिती
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडअंतर्गत वायसीएम रुग्णालयाच्या इमारतीवर 147 किलो वॅट आणि सेक्‍टर क्रमांक 23 येथील जलशुद्धिकरण केंद्रात 312 किलोवॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. ही वीज पालिका 3 रुपये 62 पैसे दराने 25 वर्षे विकत घेणार आहे. त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत एकूण 856 किलोवॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम पालिकेने सुरू केले आहे. पालिकेच्या सर्व इमारतींवर टप्प्याटप्प्याने सौरऊर्जा प्रकल्प राबविले जाणार आहे; तसेच मोठ्या हौसिंग सोसायट्या व खासगी कंपन्यांच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मितीस सुरुवात झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)