पर्यावरण प्रेमींनी काढली एक ट्रक जलपर्णी

पिंपरी – सर्व स्तरातून ओरड होवूनही पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढण्यात महापालिकेने कानाडोळा केला. त्यावेळीही शहरातील सामाजिक संस्था नदीपात्रात उतरल्या. दरम्यान, पाऊसही त्यांच्या मदतीला धावून आला. पाऊस संपल्यानंतर पुन्हा जलपर्णीने नदीपात्र फोफावली आहे. मात्र, महापालिका अद्यापही निद्रीस्त अवस्थेत असून शहरातील संस्थांनी पुन्हा एकदा जलपर्णी हटविण्याची मोहीम हातात घेतली आहे. याअंतर्गत थेरगावातील केजुबाई बंधारा येथून एक ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली.

महापालिकेकडून दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपयांची निविदा प्रसिध्द केली जाते. मात्र, ठेकेदारांकडून मोजक्‍याच ठिकाणी वरकरणी जलपर्णी काढून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जाते. पाऊस येण्याची वाट जलपर्णी काढण्यासाठी पाहिली जाते. हे दरवर्षीचे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने यावेळी सीएसआरच्या माध्यमातून जलपर्णी हटविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा पावसाची आस धरली होती. दरम्यान, जलपर्णीचा त्रास वाढल्याने रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या नेतृत्वाखाली शहरातील सामाजिक संस्था नदीपात्रात उतरल्या. जलपर्णी मुक्त पवनामाई अभियान हाती घेत त्यांनी जलपर्णी विरोधात चळवळ उभी केली. पाऊस सुरू झाल्यानंतर ही मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाळा थांबल्यानंतर महापालिकेने जलपर्णी हटविण्यासाठी हलचाली करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नदीपात्राला पुन्हा जलपर्णीने वेढा दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात सामाजिक संस्थांनी पुन्हा एकदा “जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ हे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये सलग तिसऱ्या रविवारी राबविण्यात आलेल्या अभियानात थेरगावातील केजुबाई बंधारा येथे मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी व अन्य पर्यावरण प्रेमी संस्थांनी सहभागी होत नदी पात्रातून 1 ट्रक जलपर्णी बाहेर काढली. या वेळी ज्युनियर मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना आपल्या विनोदी शैलीत नदीचे प्रदूषण आणि आपली जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.

या अभियानात रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, गणेश बोरा, फडतरे, मारुती उत्तेकर, सुनील कवडे, सोमनाथ हरपुडे, थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभू, भावसार व्हिजन इंडियाचे राजीव भावसार, लक्ष्मीकांत भावसार, राजेश कुलकर्णी, जलदिंडीचे गणेश जवळकर, जेएसपीएम कॉलेजचे प्राचार्य प्रशांत हंबर, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे हर्षद नढे, रावेत सिटीझन फोरमचे विशाल भोंडवे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सूर्यकांत मुथियान, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे ओंकार कुलकर्णी आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)