पर्यावरण एनओसीचे अधिकार स्थानिक स्वराज संस्थांकडे

केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

पुणे – केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचे अधिकार महापालिका, नगरपालिका आणि प्राधिकरणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाढत्या बांधकाम क्षेत्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने वीस हजार चौरस मीटर व त्यापुढील बांधकामांना पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखल घेण्याचे बंधन 2012 मध्ये ठेवले होते. त्यामुळे मोठ्या क्षेत्रफळावरील बांधकाम करताना पर्यावरण विभागाचा दाखला घ्यावा लागत असे. परंतु त्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे व इतर एनओसीची पूर्तता करण्यासाठी किमान वर्ष ते दीड वर्षांच्या कालावधी लागत असे. त्यामुळे बांधकाम प्रकल्प रेंगाळून त्यांच्या खर्चात वाढ होत होती. परिणामी घरांच्या किमतीवर त्याचा परिणाम होत होता. ही प्रक्रिया सुलभ करावी, तसेच वीस हजार चौरस मीटरची मर्यादा वाढवावी, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातून होत होती.

मध्यंतरी सरकारने त्यांची दखल घेत हे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतंत्र कक्ष तयार करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे आदेशही दिले होते. त्यानुसार त्यांची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू झाली होती. मध्यंतरी या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल झाली. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी सक्षम नाहीत, असे कारण देत ही तरतूद रद्द केली. त्यामुळे दाखला देण्याचे काम बंद पडले होते. असे असताना केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पुन्हा एकदा नव्याने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित काही अटींची पूर्तता करून 20 ते 50 हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा एकदा देऊ केले आहेत.

या असणार अटी
– अस्तित्वातील झाडे असतील, प्रकल्पामध्ये तोडावी लागत असेल, त्याच्या मोबदल्यात तीन झाडे लावणे.
– ऐंशी चौरस मीटर क्षेत्रासाठी एक झाड लावणे आवश्‍यक
– घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प राबविणे आवश्‍यक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)