पर्यावरणीय साक्षरता असेल, तरच सुटतील समस्या

गायत्री वाजपेयी 

पुणे – पर्यावरणीय समस्या आणि त्यांवरील उपाययोजनांनाची कमतरता यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. परिणामी, मानवी आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम दिसत आहेत. ही हानी रोखण्यासाठी एकत्रित सामाजिक, शासकीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु तत्पूर्वी पर्यावरणाच्या समस्या आणि त्याचे परिणाम यांबाबत नागरिकांमध्ये पर्यावरणीय साक्षरता असणे गरजेचे आहे.

विविध विकास प्रकल्पांमुळे वनक्षेत्रात होणारे अतिक्रमण, पाण्याची कमतरता, उपलब्ध पाण्याचे प्रदूषण, धूळ, धूलिकण यामुळे वाढते वायूप्रदूषण, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा अभाव अशा विविध पर्यावरणीय समस्यांनी आपण सर्वच ग्रस्त आहोत. तसेच पर्यावरणीय नियमांबद्दल असणारी अस्पष्टता, उपलब्ध नियमांच्या अंमलबजावणीतील उदासीनता आणि त्याचबरोबर हरित लवादाच्या कामकाजाबाबत होणारे दुर्लक्ष यामुळे पर्यावरण क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मुळात आपल्याकडे विकासाची व्याख्याच पर्यावरणविरोधी आहे. पर्यावरण हा विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असून, तो दूर केल्याशिवाय विकास होऊच शकत नाही, अशी मानसिकता आपल्याकडे असल्याने पर्यावरणाची मोठी हानी तर होतच आहे. परंतु जो विकास केला जातोय तोही मर्यादित स्वरूपाचा ठरत आहे. याउलट पर्यावरण आणि विकास यांची सांगड घालत निरोगी जीवनशैली विकसित करण्याचा प्रयत्न जगभरात होत असताना आपण मात्र विकासाच्या नावावर सर्रासपणे पर्यावरणाचे नुकसान करत आहोत.

पूर्वापार मिळालेल्या जैवविविधतेचा वारसा नष्ट करून इतिहासाची पावले पुसून जो विकास साधला जातोय, तो कितपत टिकेल याबाबत जाणकारांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन या प्रश्‍नाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे.

पर्यावरण रक्षण ही कोणत्याही एका घटकाची जबाबदारी नसून ते सार्वजनिक कर्तव्य आहे. ही भावना जनमाणसात रूजणे आवश्‍यक आहे. जे पर्यावरण आपल्याला जीवनावश्‍यक गोष्टींचा पुरवठा करतो, ते पर्यावरण “अबाधित, सुरक्षित राहो’ हे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात रूजेल तेव्हाच या समस्या सोडविण्याकडे आपली वाटचाल सुरू होईल.

सद्यस्थितीत ही जबाबदारी केवळ प्रशासन, सामाजिक संस्था अथवा काही पर्यावरणप्रेमी यांच्यापुरतीच मर्यादित असल्याचा (गैर)समज बहुसंख्य नागरिकांमध्ये दिसतो. ही पर्यावरणीय असाक्षरता केवळ अशिक्षित, गरीब लोकांमध्येच आहे असे नव्हे, तर उच्चशिक्षित, श्रीमंत, तरूण वर्गातही या असाक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देणारी पर्यावरणीय साक्षरता होणे अवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)