पर्यावरण रक्षणासाठी चक्री उपोषण सुरू

शहरातील विविध संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

पुणे – मैलापाण्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण, जलस्रोतांवर सातत्त्याने होणारे आक्रमण, पक्षी अभयारण्यांची दुरवस्था, नदी परिसरातील नष्ट होणारी जैवविविधता आदी कारणांमुळे पर्यावरणाला धोका उद्‌भवत आहे. मात्र, याकडे वारंवार लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न झाल्यानंतरही शासकीय यंत्रणांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे चिंताग्रस्त पर्यावरण कार्यकर्त्यांनी अखेर चक्रीउपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शहरातील विविध ठिकाणी दररोज उपोषण करीत पर्यावरणाच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरणीय समस्या या अलीकडील काळात गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचे विविध परिणाम भोगावे लागत आहे. केवळ मनुष्यच नव्हे, इतर पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती आदी घटकांना या समस्यांमुळे झळा बसत आहेत. मात्र, या समस्यांची दखल गंभीरपणे घेण्याचे धारिष्ट्य शासनाकडून दाखविले जात नाही. गेली अनेक दिवस सातत्याने नदी अविरत प्रवाही आणि तिची स्वच्छता व्हावी, नदी परिसरात होणारे बांधकाम आणि त्यातून होणारे अतिक्रमण यावर प्रतिबंध केला जावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. मात्र, शासनाकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्‍नावर उपाय म्हणून या पर्यावरण कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

याबाबत चळवळीचे मुख्य संयोजक आणि पर्यावरण कार्यकर्ते निरंजन उपासनी म्हणाले, “केवळ शहरातच नव्हे, तर देशभरात नद्यांची दुरवस्था झाली आहे. नदी स्वच्छतेच्या नावावर केवळ घोषणाबाजी होत आहे. प्रत्यक्षात मात्र, यासंदर्भात कोणतेही काम केले जात नाही. इतकेच नव्हे तर, याविषयी आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांचीदेखील दखल घेतली जात नाही. दिल्ली येथे नदीसुधारणेविषयी उपोषण करणाऱ्या जी. डी. अगरवाल यांचा उपोषणादरम्यान मृत्यू होतो, हे याचे संतापजनक आहे. अगरवाल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणादरम्यान शहरातील विविध ठिकाणी एक व्यक्‍ती उपोषण करून ही साखळी पुढे नेत आहे. त्याचबरोबर नदी सुधारणा आणि पर्यावरणविषयक जनजागृतीदेखील या माध्यमातून केली जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या चळवळीत विविध क्षेत्रातील आणि विविध स्तरातील नागरिक या पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेत सहभागी झाले आहेत.

इयत्ता 10 वीत शिकणारी विशाखा कुलकर्णी ही या चळवळीत सहभागी झालेली सर्वांत कमी वयाची कार्यकर्ती आहे. आगामी काळात ही चळवळ व्यापक स्वरूप धारण करून पर्यावरण रक्षणाचे काम अधिक जलदगतीने होईल, अशी अपेक्षा आम्हाला वाटत आहे, असे मत धर्मराज पाटील यांनी व्यक्‍त केले आहे.

मोहिमेतील प्रमुख मागण्या :
– नदी, नाले, ओढे यांच्यावरील अतिक्रमण हटवून बांधकामांवर बंदी घालावी.
– मैलापाण्याचे शुद्धीकरण
– स्वच्छ आणि कायम प्रवाही नदी.
– शहरातील पक्षी अभयारण्याची सुरक्षितता राखावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)