सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र

पुणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात सहभागी होऊ नका, असा अजब फतवा मागील वर्षी काढलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यंदा शहाणपण आले असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी व्हावे, असे विद्यापीठ प्रशासनाने यंदा सांगितले आहे.

उच्च शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक विजय नारखेडे यांनी मागील वर्षी “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊ देऊ नये,’ असे पत्र विद्यापीठ प्रशासनाला पाठविले होते. त्यानुसार विद्यार्थी कल्याण मंडळाने सर्व महाविद्यालयांना त्याबाबतचे निर्देश दिले होते. याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यापर्श्वभुमीवर मात्र यंदाच्या वर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमार्फत गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छतेबाबत जनजागृती, निर्माल्य संकलन, मूर्तीदान आदी उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच महाविद्यालयांनी निर्माल्य संकलन केल्यानंतर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी त्याचा उपयोग करावा. गणेशोत्सव कालावधीमध्ये पोलीसमित्र म्हणून काम करीत असताना संबंधित पोलीस ठाण्यामार्फत विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे परिपत्रक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी काढले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उपक्रम राबवित असताना कोणत्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काटेकोरपणे काळजी घ्यावी. गणेशोत्सवाचे उपक्रम झाल्यानंतर त्याबाबतचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयास पाठवावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)