पर्याय लाकडी इमारतीचा

गगनचुंबी इमारती बांधण्याची स्पर्धाच जगात लागली आहे. चीन आणि दुबईनंतर युरोपातील देशही या स्पर्धेत सहभागी झाले. आता भूकंपाचा देश म्हणून ओळखला जाणारा जपानही सरसावला आहे. राजधानी टोकियोमध्ये सुमारे 1148 फूट उंचीची गगनचुंबी इमारत बांधण्याची घोषणा करण्यात आली असून, हा प्रकल्प 2041 मध्ये पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, ही जगातील सर्वांत उंच लाकडी इमारत ठरणार आहे. भूकंपाचे झटके वारंवार झेलणाऱ्या जपानसाठी ही लाकडी इमारत पर्यावरणपूरक ठरणार आहे.

गगनचुंबी इमारती बांधण्याच्या शर्यतीत उतरणे जपानच्या दृष्टीने तसे धोकादायकच! कारण जपान हा भूकंपप्रवण देश असून, सतत कुठे ना कुठे भूकंपाचे हादरे बसतच असतात. भूकंपाची तीव्रता उंचावर अधिक जाणवते. त्यामुळे उंच इमारती जमीनदोस्त होण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच जपान इतकी वर्षे गगनचुंबी इमारती बांधण्याच्या शर्यतीपासून दूर राहिला असावा. आता मात्र तेथील पर्यावरणास पूरक अशी संपूर्ण लाकडाची इमारत उभारण्याची घोषणा जपानने केली आहे. ही प्रचंड उंचीची इमारत सुमितोमो फॉरेस्ट्री लिमिटेड या व्यापारी कंपनीकडून बांधली जाणार असून, “डब्ल्यू 350′ नावाच्या या इमारतीचे बांधकाम 2041 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. ही इमारत तब्बल 1148 फूट उंचीची असेल.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, केवळ उंचच उंच इमारत उभी करणे, हे उद्दिष्ट नसून, कॉंक्रिटचे जंगल निर्माण करण्यापेक्षा पर्यावरणपूरक इमारत बांधण्याचा हेतू आहे. लाकूड आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या मिश्रणातून ही इमारत उभारली जाईल आणि ती तब्बल सत्तर मजल्यांची असेल. या इमारतीच्या बांधकाम साहित्यातील 90 टक्के हिस्सा लाकडाचा असेल. एका अंदाजानुसार, ही इमारत बांधण्यासाठी सामान्यतः 60 लाख 50 हजार घनफूट एवढ्या लाकडाची गरज भासेल आणि बांधकामाचा एकूण खर्च सुमारे 4.2 अब्ज युरो एवढा प्रचंड असेल.

सुमितोमो फॉरेस्ट्री ही कंपनी खूपच जुनी असून, आपला 350 वा वर्धापनदिन संस्मरणीय करण्यासाठी कंपनीकडून या इमारतीची बांधणी केली जात आहे. या इमारतीत सुमारे आठशे घरे असतील आणि त्यांच्या बाल्कनीत झाडे आणि रोपे मुद्दाम लावली जातील; वाढवली जातील. रहिवासी घरांबरोबरच दुकाने, कार्यालये, हॉटेल्स या इमारतीत असतील. जेव्हा ही इमारत पूर्ण होईल, तेव्हा ती जपानमधील सर्वांत मोठी तर जगातील लाकडाची सर्वांत मोठी इमारत ठरेल. लाकडापासून बनविलेली जगातील सर्वांत उंच इमारत ठरण्याचा बहुमान सध्या ब्रॉक कॉमन्स टॉलवूड हाऊस या इमारतीला लाभला आहे.

त्याहूनही उंच ठरणारी ही इमारत भूकंपरोधी बनविण्यासाठी इमारतीच्या केंद्रस्थानी ट्युबच्या आकाराची 1100 फुटांची एक खास संरचना तयार केली जाणार आहे. अशा प्रकारची लाकडाची इमारत अग्निरोधक असणे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात सध्या लोकप्रिय होत चाललेले क्रॉस लॅमिनेटेड टिंबर हे इमारती लाकूड अग्निरोधक असतेच. तापमान वाढल्यानंतरसुद्धा अशा प्रकारचे लाकूड सुरक्षित राहू शकते. स्टील आणि कॉंक्रिटपासून बांधलेल्या इमारतींमुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्‍साइडचे उत्सर्जन अधिक प्रमाणात होऊन पर्यावरणाला घातक ठरतात.

जागतिक कार्बन उत्सर्जनात इमारतींपासून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण पाच ते आठ टक्के इतके असते. याउलट लाकूड कार्बनडाय ऑक्‍साइडला वातावरणात पसरू न देता शोषून घेण्याचे काम करते.

जपानमध्ये हरित आच्छादन चांगले असून, जमिनीचा मोठा हिस्सा जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे लाकडाची उपलब्धता भरपूर आहे. जपानमध्ये इमारतींच्या बांधकामासाठी लाकडाचा वापर बऱ्याच काळापासून अधिक प्रमाणात केला जात आहे. मात्र, तरीही वृक्षाच्छादन कायम राहील, याची काळजी घेतली जाते. अर्थात, काही वर्षांपासून जंगलात लागणाऱ्या आगींमुळे लाकडाची कमतरता जपानला जाणवू लागली आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानमध्ये बॉंबस्फोटांमुळे जंगलांचे अतोनात नुकसान झाले होते; परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर लावण्यात आलेल्या जपानी देवदार आणि सुरूच्या वृक्षांची वाढ आता पूर्ण झाली असून, ते कापण्यायोग्य झाले आहेत. त्यामुळेही कदाचित इमारतींच्या बांधकामात लाकडाचा अधिक वापर करण्याचा विचार जपानमध्ये होत असावा. अर्थात, वातावरण बदलांच्या ज्या युगात आपण सध्या पोहोचलो आहोत, त्या स्थितीत वृक्षतोड आपल्याला महागात पडू शकते, याची जाणीवही कंपनीला आहे.

दुसरीकडे, जगभरात आर्किटेक्‍चर कंपन्यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लाकडी इमारतींच्या बांधकामाला वेग आला आहे. लाकूड ही बांधकामाची प्राथमिक सामग्री मानली जाते. मात्र, “डब्ल्यू 350′ सारख्या विशाल लाकडी इमारतीचा प्रकल्प अद्याप कोणत्याही कंपनीने हाती घेतलेला नाही. वास्तुविशारदांच्या मते, लाकूड आणि अन्य सामग्रीचे मिश्रण करून इमारतींचे बांधकाम होऊ लागल्यामुळे बांधकाम क्षेत्र नव्या वळणावर आहे. एका कंपनीने फुजी पर्वताच्या उतारावर “रिटायर्मेन्ट फॅसिलिटी’ तयार केली आहे.

सध्या जपानमध्ये राहण्यायोग्य लाकडाची सर्वांत मोठी संरचना हीच मानली जाते. रिकार्डोन या वास्तुविशारदाने वीस वर्षांपूर्वी जपानमधील टोकियो शहरात बांधकामाला सुरुवात केली होती. त्याच्या मते, जपानमधील बहुतांश वास्तुविशारद बांधकामासाठी लाकडाचा उपयोग उत्तम प्रकारे करण्याची कला शोधण्याचा प्रयत्न सध्या करीत आहेत.

– अमोल पवार, कॅलिफोर्निया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)