पर्यटन व्यवसायातून होतेय रोजगारवृद्धी (भाग एक)

आपल्या राज्यात पर्यटनासाठी अनेक स्थळे आहेत. देशविदेशातील पर्यटक येथे गर्दी करत असतात. साहजिकच, त्यामुळे आजमितीला इतर कोणत्याही सेवाक्षेत्रापेक्षा पर्यटन उद्योग हा रोजगार निर्मितीत महत्त्वाचा मानला जातो. आता आपल्याकडे पर्यटन धोरणही जाहीर झाले आहे. या धोरणातून पर्यटन विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे. त्यामुळेच र्यटकांची संख्याही वाढत गेली आणि लोकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.

भारत ही एक पर्यटननगरी आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातही पर्यटनासाठी अनेक स्थळे आहेत. देशी-परदेशी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात. पर्यटनक्षेत्र हा एक व्यवसाय बनला आहे. विविध ठिकाणची पर्यटनस्थळे दाखवण्यापासून त्याची माहिती देण्यापर्यंत या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. अगदी ट्रॅव्हल कंपनी कार्यालयापासून प्रत्यक्ष पर्यटनस्थळापर्यंत रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी याचा व्यापक विचार करायला हवा.

आपल्याकडे गुंतवणूक करण्याची क्षमता असेल आणि कोणत्याही अडथळ्यांना सामोरे जाण्याची ताकद असेल तर ट्रॅव्हल कंपनी काढायला हरकत नाही. स्वत: एखाद्या पर्यटनसंस्थेचे मालक असण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. शंभर टक्के सकारात्मक दृष्टीकोन आणि स्वत:ला फिरण्याची हौस असेल तर ही भूमिका उत्तमरित्या वठवता येते. एकट्याने अशी कंपनी सुरू करता येत नसेल तर भागीदारीतही हा व्यवसाय करता येतो. या कंपन्यांचा एजंट म्हणूनही आपल्याला काम करता येते.एखाद्या ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय एखाद्या शहरात असेल तर इतर शहरांमध्ये असे एजंट काम करतात. त्यांना प्रत्येक प्रवाशामागे किमान पाच टक्के कमीशन मिळते.यातूनही चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते. एखादा एजंट बऱ्याच कंपन्यांसाठीही काम करु शकतो. त्यामुळे त्याला जास्त पैसे मिळू शकतात. या कंपन्यांच्या कार्यालयामध्येही विविध कामे करता येतात. यामध्ये बुकिंग क्‍लार्क महत्त्वाची भूमिका बजावतो. रेल्वे, विमान किंवा टूर बुकिंग अशी महत्त्वाची कामे त्याला करता येतात.

पर्यटन व्यवसायातून होतेय रोजगारवृद्धी (भाग दोन)

पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागत असली तरी कोणत्याही राज्यांसाठी ती फायदेशीरच ठरत आहे. पर्यटनामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि राष्ट्रीय संपत्तीचे रक्षणही चांगल्या प्रकारे होते. एखादे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाल्यावर त्या ठिकाणी अनेक सुविधा उत्पन्न होतात. अशा ठिकाणी विविध व्यवसाय करण्याच्याही संधी निर्माण होतात आणि या व्यवसायातून अनेकांना रोजगारही मिळू शकतो. या क्षेत्रात गुंतवणूक केलेल्या प्रत्येकी 10 लाखांमागे 40 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तसेच हॉटेल व्यवसायातून 9 प्रत्यक्ष आणि 14 अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतात. त्यामुळेच इतर कोणत्याही सेवाक्षेत्रापेक्षा पर्यटन उद्योग हा रोजगार निर्मिती महत्त्वाचा मानला जातो. आपल्याकडील पर्यटकांना परदेशात नेणे जेवढे आवश्‍यक आहे तेवढेच परदेशातील आपल्या देशात आमंत्रित करुन त्यांना त्यांच्या देशात सुखरुपपणे पाठवून मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन करता येते. या पार्श्‍वभूमीवर हॉस्पिटॅलिटीविषयी जाणून घेणे औचित्याचे ठरेल.

पर्यटनक्षेत्राचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्‍यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या अनेक ठिकाणी निवास आणि अन्य सुविधांची वानवा दिसते. कोकणातील अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येतो. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा सरकारने पुरवल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. गेल्या काही वर्षात दहशतवादामुळेही पर्यटनाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद प्रतिबंधक निर्भय वातावरण निर्माण करणे हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्‍यक आहे.

महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास समृध्द नैसर्गिक वारशांमुळे येथे पर्यटन स्थळांची कमतरता नाही. पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने आपल्या राज्याएवढी विविधता इतर ठिकाणी पहायला मिळत नाही. हजारो वर्षांच्या वैभवी इतिहासाची साक्ष देणारे मजबूत गडकिल्ले आपल्या राज्यात आहेत. याप्रमाणेच अनेक सागरी किल्लेही आहेत. अशा राज्यात पर्यटन व्यवसायही जोरात आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊन आघाडी घेता येईल.

– रियाज इनामदार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)