पर्यटनावर ट्रॅफिक जॅमचे ‘विरजन’

पावसाळी पर्यटनाचा ट्रेंड वाढला : निखळ करमणुकीवर विरजन

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा हिरमोड
पुणे शहराबाहेरील पर्यटनस्थळे गजबजली

पुणे –  पावसाळी पर्यटनाचा ट्रेंड मागील काही वर्षापासून वाढत आहे. यामध्ये पाऊस पडल्यानंतर जवळच्या पर्यटनस्थळांवर निर्माण झालेल्या धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद घेण्यास प्राधान्य दिले जाते. एरव्ही यासाठी भुशी डॅम प्रसिध्द होता. मात्र, तिथे होणारी मोठ्या प्रमाणातील गर्दी, दरवर्षी होणारे अपघात आणि मुंबई-पुणे एक्‍सप्रेसवर विकेंडला होणारे ट्रॅफिक जाम, आदी कारणामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा मोर्चा मुळशी, पानशेत, वेल्हा ताम्हिनी घाट, महाबळेश्‍वरकडे मोठ्या प्रमाणात वळवला आहे. याचा परिणाम म्हऊन एरवी शांत असलेली ही ठिकाणे प्रत्येक विकेंडला गर्दीने गजबजलेली दिसत आहेत. इतकेच नव्हे तर पर्यटकांचा वाढत्या ओघामुळे येथेही वाहतूक कोंडीला सुरवात झाली आहे. यामुळे निखळ पर्यटनाचा आनंद लुटण्यास बाहेर पडलेल्या पर्यटकांचा हिरमोड होऊ लागला आहे.

यासंदर्भात ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेचे संचालक निलेश भंन्साळी सांगतात की, सध्याच्या धावपळ व दगदगीच्या जीवनात प्रत्येकालाच कामातून तसेच अभ्यासातून ब्रेक हवा असतो. हा ब्रेक पावसाळी पर्यटनाच्या माध्यमातून घेण्याकडे कल वाढत आहे. यासाठी विकेंडला शहरालगतच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यास प्राधान्य दिले जाते. तरुण-तरुणींचे ग्रुप, एकत्र कुटुंब, कंपनीतील सहकारी आवर्जुन पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यास बाहेर पडत आहेत. पुणे शहराचा विचार करता मुळशी, ताम्हिनी घाट, वेल्हा, सिंहगड, लोणावळा-खंडाळा, महाबळेश्‍वर येथे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढला आहे. काही संस्थाही पावसाळी पर्यटनाचे आयोजन करतात. मुळशी व वेल्हा भागात तरुणांना भातलावणीचा अनुभव देण्याचा उपक्रमही राबवला जात आहे. यामुळे हे परिसर विकेंडला गर्दीने फुललेले असतात. सध्याची परिस्थिती पाहता विकेंडला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी तास्‌नतास पर्यटकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

स्टंटबाजी अंगलट
परिसरांमध्ये रिसॉटची संख्या वाढली आहेत. तसेच बंगले आणि हाऊस स्टेचा पर्यायही पर्यटकांना उपलब्ध आहे. यामुळे पर्यटक एक ते दोन दिवस येथे येऊन राहण्यास प्राधान्य देतात. यामुळेही या परिसरातील गर्दीमध्ये वाढ झालेली दिसते. पावसाळ्यामध्ये किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याची ट्रेंड वाढत आहे. युवक आणि युवतीच्या ग्रुपसह कुटुंबांने किल्यावर फिरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. लोहगड, सिंहगड, विसापुर, तोरणा, राजगड, राजमाची, त्रिकोणा तसेच शिवनेरी किल्लावर गर्दी वाढू लागली आहे. अनेक ट्रेकर्स ग्रुप किल्ले पर्यंटनाचे आयोजन करत आहेत. किल्ल्यावरील तलावात पोहणे, गडाच्या तटबंदीवर सेल्फी काढणे, स्टंटबाजी करण्याचे प्रकार केले जातात. यामुळे किल्ल्यावर अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे किल्ल्यावर जा, पण जरा जपून…

 मौजमजा करा..पण जपूनच

  • मौजमजा करा, पण अन्य पर्यटक दुखावले जाऊ नये
  •  वाहतूक कोंडी होणार नसल्याची दक्षता घ्या
  •  वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगावीत
  •  दारू पिऊन वाहन चालवू नयेत.
  •  हुल्लडबाजी करू नये
  •  पर्यटनास्थळी वेगाने वाहन चालवू नका

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)