पर्यटकांचे माविम डेस्टिनेशन काठी हिलस्टेशन

सूर्यकांत पाटणकर

पाटण – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनामाईचा विस्तीर्ण शिवसागर जलाशय सर्वत्र पसरलेल्या घनदाट जंगलांनी व्यापलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, वनसंपदा, जैविक संपदेच्या घटकांचे विपुल अस्तित्व यामुळे मुर्तीमंत पर्यावरणाच्या साक्षात्काराचे दर्शन याठिकाणी होत आहे. निसर्गाचे जतन करुन निसर्ग सौदर्याचा विलोभनीय अविष्कार साकारणारे पर्यटकांचे नविन डेस्टिनेशन काठी निसर्ग निर्मित अनोख्या सौंदर्याची अनुभूती पर्यटकांना देत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुध्द हवा, निर्मळ पाणी, विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा अनोखा अविष्कार, आरोग्यमय जीवनासाठी आवश्‍यक अल्हाददायक वातावरण कोयनेच्या शिवसागर जलाशयाला अगदी खेटून विसावलेल्या डोंगररांगा, पाणी, जमीन, आकाश यांचा त्रिवेणीसंगम अशा नयन मनोहर निसर्ग सौंदर्याच्या उधळणीची अनुभूती घेण्यासाठी नविन डेस्टीनेशन काठीला पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रतील महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण देश विदेशातील पर्यटकांना ज्ञात आहे. ब्रिटीशांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाबळेश्‍वर पर्यटकांनी सदैव गजबजून गेलेले पहावयास मिळते. मात्र अलीकडच्या काळात याठिकाणावर पर्यटकांचा वाढणारा भार व त्यामुळे सोयीसुविधांचा होणारा अभाव यासाठी नविन पर्यटन पॉंईट विकसित होणे गरजेचे होत आहे. यासाठीच कोयना पर्यटनाची संकल्पना पुढे आली.

कोयना धरणामुळे जगाच्या नकाशावर गेलेल्या कोयना पसिराला जलविद्युत प्रकल्पामुळे महत्व प्राप्त झाले. त्यामुळे नविन पर्यटन केंद्र म्हणून कोयना परिसर विकसित होण्यासाठी सज्ज झाले. मात्र कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरातील पर्यटनावर बंधने निर्माण झाली. जलाशयातील नौकाविहार बंद झाले. पर्यायाने पर्यटन व्यवसाय धोक्‍यात आला. मात्र निसर्ग सौंदर्याची अद्‌भूत देणगी मिळालेल्या हा परिसर पर्यटकांच्या पुढाकाराने पुन्हा बहरु लागला आहे. कोयना जलाशयाच्या बाजूला असणाऱ्या डोंगररांगावर प्रती महाबळेश्‍वर म्हणून हा परिसर विकसित होत आहे.

काठी हिलस्टेशन म्हणून उदयास येत असलेल्या या परिसराला राज्यभरातून पर्यटकांची पसंती मिळत आहे. या हिलस्टेशनवरुन दिसणारे निसर्ग सौंदर्य अद्‌भूत आहे. शिवसागर जलाशयावर पसरलेले ढगांचे अच्छादनाचे दृष्य पर्यटकांना मिनी काश्‍मिरचे अनुभूती देत आहे तर अंगाला झोंबणारा गार वारा पर्यटकांना सुखावून जातो. विविध पक्षी, प्राणी यांचे होणारे दर्शन वन पर्यटनाचा आनंद पर्यटकांना देतात. या ठिकाणावरुन दिसणारा सूर्यास्त अलौकिक आहे. हळूहळू या परिसराची भुरळ सिने दिग्दर्शक कलांवतांना पडू लागली आहे. शुटिंगसाठी याठिकाणाला पसंती देण्यात येत आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या या परिसराला शासनाच्या सकारात्मक धोरणांची गरज आहे. पर्यटनासाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यास पर्यटनाला चालना मिळणार आहे. काठी पर्यटकांचे नविन हिल डेस्टिनेशन निर्माण झाले असून भविष्यात वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्‍वास पर्यटकांमधून व्यक्‍त होत आहे.

राज्य पर्यटन महामंडळाकडून दखल

काठी परिसर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून पर्यटनासाठी हा परिसर अल्हाददायक आहे. येथील पाणी, शुद्ध हवा, विस्तीर्ण पसरलेला शिवसागर, जलाशयाचे दिसणारे विहंगम दृष्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. पर्यटकांना राहण्यासाठी निवासाची सोय उपल्बध आहे. भविष्यात हे ठिकाण प्रती महाबळेश्‍वर म्हणून ओळखले जाईल. कारण महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन महामंडळाने त्यांच्या माहिती पुस्तिकेवर काठीच्या पर्यटनाचे मनोहरी दृष्य सध्या झळकत आहे. त्यामुळे काठी परिसराची दखल शासनाने घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)