पराभवाचा वचपा काढण्यासाठी गुजरात सज्ज

कोलकाता, पाचपैकी चार सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या गुजरात लायन्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात शुक्रवारी (दि. 21) भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मोसमात गुजरातचा संघ कोलकाताविरुद्ध पहिला सामाना शुक्रवारी (दि.7) खेळला असून त्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी गुजरातचा संघ उद्याच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
गुजरात सांघिक कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत आहे. कोलकाता नाईट रायडर्स व सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लायन्सने रायजिंग पुणे सुपरजायंट्‌सविरुद्ध आयपीएलच्या दहाव्या पर्वात पहिला विजय नोंदवल्यानंतर मुंबई आणि बंगळुरुविरुद्ध सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांची गुणतालिकेत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली. गुजरातचे आघाडीचे फलंदाज ब्रॅन्डन मॅक्‍युलम, ऍरोन फिंच, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्मात आहेत, पण त्यांना सांघिक कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्‌वेन स्मिथला मुंबई आणि बंगळुरुविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही, पण सलामीवीर म्हणून मॅक्‍युलमच्या साथीने तो महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
गुजरातसाठी गोलंदाजी चिंतेची बाब ठरली होती, पण ऍन्ड्रयू टायच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. टायने पुण्याविरुद्ध पाच बळी घेत चमकदार कामगिरी केली होती. त्यात हॅट्टिकचाही समावेश होता. त्याने रविवारी मुंबईविरुद्धच्या लढतीतही दोन बळी घेतले. तर मंगळवारी बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही. प्रवीण कुमार पहिल्या दोन षटकांत चांगली कामगिरी करतो, पण डेथ ओव्हर्समध्ये तो महागडा ठरला असल्याने त्याला बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तर मुनाफ प्रभावशाली न ठरल्याने बंगळुरुविरुद्ध त्याला विश्रांती देत धवल कुलकर्णीला पुन्हा संधी देण्यात आली. केरळच्या बासिल थम्पी मुंबई आणि बंगळुरुविरुद्ध प्रभावी मारा करण्यात यशस्वी ठरला असल्याने उद्याच्या सामन्यात त्याला वगळण्याची शक्‍यता कमीच आहे.
कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे हे कोलकाताचे फलंदाज सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. युसुफ पठाण, सूर्यकुमार यादव यांच्याकडून त्यांना दमदार साथ मिळत असल्याने त्यांची फलंदाजी कोणत्याही गोलदांजांचा सामना करण्यात सक्षम आहेत. तर कोलकाताच्या गोलंदाजीची खरी ताकद त्यांच्या फिरकीत आहे. शकिब अल हसन, पियुष चावला, चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि मिस्टरी मॅन सुनील नारायण या दिग्गज फिरकी गोलंदाजांवर कोलकाताला विजय मिळवून देण्यात आणि प्रतिस्पर्धी संघावर अंकुश ठेवण्यात आत्तापर्यंत तरी यशस्वी झाले आहेत. एकुणच काय तर कोलकाताची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्कृष्ट होत असल्याने उद्याच्या सामन्यात त्यांचे पारडे जड राहण्याची शक्‍याता जाणकारांनी व्यक्‍त केली आहे.
चौकट : विजयाची घोडदौड कायम राखण्यास इच्छुक
कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघातील फलंदाजी आणि गोलंदाजांकडून चांगली कामगिरी होत असल्याने त्यांची विजयी घोडदौड सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात चार विजायासह एक पराभव स्वीकराला असल्याने ते गुणतालिकेत अव्वलस्थानावर विराजमान आहेत, त्यामुळे हीच विजयाची घौडदौड उद्याच्या सामन्यात कायम राखण्याच्या इराद्याने कोलकाताचा संघ मैदानात उतरणार आहे.
चौकट : गुजरातची फिरकीची बाजू कमकुवत
रवींद्र जडेजाच्या पुनरागमनानंतरही फिरकीची बाजू कमकुवत भासत आहे. जकाती व कौशिक महागडे ठरले आहेत. त्यामुळे गुजरात लायन्सची प्रमुख मदार फलंदाजीवरच असेल. त्यातही ब्रेंडन मॅक्क्‌युलम आणि ड्‌वेन स्मिथ या सलामीवीर जोडीवर. कर्णधार सुरेश रैना आणि आरोन फिंच सुद्धा जबाबदारीने फलंदाजी करीत आहेत. तर वेगवान गोलंदाजीत गुजरातच्या गोलंदाजीचा आता प्रमुख आधारस्तंभ असेल तो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ऍण्ड्रयू टाय. त्याने आयपीएल पदार्पणातच हॅट्टिक नोंदवण्याची किमया साधली. मात्र उद्याच्या सामन्यात जर रवींद्र जडेजा आणि शदाब जकाती यांची भूमिकासुद्धा निर्णायक ठरू शकते असे जाणकारांचे मत आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
कोलकाता नाईट रायडर्स – गौतम गंभीर (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, ट्रेन्ट बोल्ट, पियुष चावला, नॅथन कूल्टर नाईल, कॉलिन ग्रॅंडहोम, ऋषी धवन, सायन घोष, शकिब अल हसन, शेल्डन जॅक्‍सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, ख्रिस वोक्‍स, ख्रिस लिन, सुनील नारायण, मनीष पांडे, युसुफ पठाण, अंकित राजपूत, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा व उमेश यादव.
गुजरात लायन्स- सुरेश रैना (कर्णधार), रवींद्र जडेजा, ब्रेन्डन मॅक्‍युलम, ड्‌वेन स्मिथ, ऍरॉन फिंच, दिनेश कार्तिक, आकाशदीप नाथ, ईशान किशन, मनप्रीत गोनी, रवींद्र जडेजा, शादाब जकाती, शिविल कौशिक, जेसन रॉय, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, बासिल थंपी, नथू सिंग, तेजस बारोका, शुभम आगरवाल, शेली शौर्य, ऍन्ड्रयू टाय व जेम्स फॉकनर.
सामन्याचे ठिकाण- कोलकाता. सामन्याची वेळ- रात्री 4 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)