पराग वाचला व्यसनांच्या विळख्यातून…

पौगंडावस्थेतच मुलांना मित्रांच्या संगतीने व्यसने लागण्याचा धोका असतो. हा धोका पालकांनी, शिक्षकांनी लगेच ओळखणे महत्त्वाचे असते.
सध्या इयत्ता सातवीमध्ये नुकत्याच आलेल्या परागला घेऊन त्याच्या वर्गशिक्षिका भेटीसाठी आल्या. शाळा सुरू होऊन जेमतेम 1 महिनाच झाला होता. पण या एक महिन्यातच बाईंना परागच्या वाईट सवयी लक्षात आल्या होत्या. वर्ष नुकतेच सुरू झाल्याने त्याला नवीन वर्गात रुळायला अडचण येऊ नये म्हणून बाईंनी त्याला अनेकदा त्यांचा तास संपल्यावर वर्गातून बाजूला घेऊन प्रेमाने, आपुलकीने समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
शाळा सुरू झाल्यानंतर 3/4 दिवशीच बाईंना परागच्या बॅगेत गुटख्याच्या पुड्या सापडल्या. सुरुवातीला त्यांनी विचारलं तेव्हा त्याने रस्त्यावरचे कागद उचलल्याचे सांगितले. बाई थोड्या रागावल्या आणि त्याला सोडून दिलं. पण हे कारण न पटल्याने पुन्हा त्यांनी थोड्या दिवसांनी परागची बॅग तपासली. तेव्हा त्यांना बॅगेत पुन्हा भरलेल्या गुटख्याच्या पुड्या सापडल्या मग मात्र बाई त्याला खूप रागावल्या आणि पुड्या कशा आल्या विचारलं तेव्हा त्यांनी आधी बाबांचं मग मित्रांचं अशी नाव सांगायला सुरुवात केली. तेव्हा बाईंनी भीती वाटावी म्हणून मुख्याध्यापिकांकडे घेऊन जाण्याची भीती दाखवली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
उलट गेल्या काही दिवसांपासून तर त्याला जवळ बोलावलं की अंगाला सिगारेटचा सुद्धा वास येत होता. त्यामुळे बाईंनी याचे गांभीर्य ओळखून प्रथम ही बाब मुख्याध्यापिकांच्या कानावर घातली. पालकांना बोलावण्यापूर्वी मुख्याध्यापिकांनी सुचवल्यानुसार बाई परागला समुपदेशनासाठी घेऊन आल्या होत्या. 7 वी मधला मुलगा असं वागू शकतो हा बाईंसाठीच धक्‍का असल्याचे त्या अगदी पोटतिडकीने बोलत होत्या. हे सारं बोलणं होईपर्यंत बाईंनी परागला बाहेरच बसवलं होतं.
सारं सांगून झाल्यावर बाईंनी परागला आत पाठवलं आणि त्या वर्गावर निघून गेल्या. आपण केलेल्या चुकीसाठी बाई आपल्याला इथे घेऊन आल्यात हे लक्षात आल्याने पराग या सत्रात फारसं काहीच बोलला नाही.
त्यानंतरच्या दोन-तीन सत्रातही तो शांतच होता. विचारलेल्या प्रश्‍नांची मोजकीच उत्तर देत होता. पण हळूहळू ओळख झाल्यावर आणि विश्‍वास वाटायला लागल्यावर तो थोडा थोडा बोलायला लागला. त्याला ही सवय कशी लागली हे मात्र तो सांगत नव्हता. त्यामुळे मानसशास्त्रातील काही तंत्र वापरून काही ऍक्‍टिव्हिटी देऊन त्याच्या समस्येसंदर्भात
अधिक सखोल माहिती घेण्यात आली. ज्यातून असं लक्षात आलं की त्यांच्या घराजवळ सगळ्या मुलांचा एक “कट्टा’ आहे. या कट्ट्यावर त्यांच्या जवळपासच्या बिल्डिंगमधली सगळी मुलं खेळण्यासाठी एकत्र येतात. त्यातल्याच 11 वी मधल्या दोन मुलांमुळे परागला ही गुटख्याची आणि सिगारेटची सवय लागली होती. रोज खेळायला जमल्यावर पराग चव बघण्यासाठी सुरुवातीला त्यांच्यातला थोडा गुटखा खायला लागला आणि हळूहळू त्याला त्याची सवय लागली. सिगारेटबाबतही असंच घडलं. या साऱ्याचं गांभीर्य परागला समजत नसलं तरी त्याच्याही नकळत त्याला ही वाईट सवय लागली होती.
परागच्या समस्येचं गांभीर्य बरंच असल्याने या सत्रानंतर त्याच्या आई-वडिलांना ताबडतोब बोलावून घेतलं. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली पण शाळेतून फोन गेल्यावर मात्र ते ताबडतोब भेटीसाठी आले. या सत्रादरम्यान त्या दोघांनाही परागच्या समस्येची कल्पना देण्यात आली.
हा सारा प्रकार ऐकल्यावर परागची आई खूपच घाबरून गेली आणि वडील तर इतके संतापले की ते त्याला मारायला निघाले होते. पण अशा प्रतिक्रियेचा परागवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे त्यांना समजावून सांगितल्यावर ते थोडे शांत झाले. त्यानंतर काही काळ परागची आणि त्याचबरोबर त्याच्या आई-वडिलांचीही सलग सत्र घेण्यात आली. या सत्रात परागला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विविध मानसोपचारतंत्र वापरून त्याच्या अयोग्य वर्तनाची आणि त्याच्या परिणामांच्या गांभीर्याची कल्पना देण्यात आली.
याचप्रमाणे काही वर्तनसुधार वापरण्याबाबत पालकांनाही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दोघांनीही यास उत्तम प्रतिसाद दिल्याने हळूहळू याचा चांगला परिणाम दिसून आला. परागवर कोणताही गंभीर परिणाम न होता. त्याच्या या समस्या हळूहळू सुटत गेल्या आणि त्याची ही दोन्ही व्यसनं लागण्याआधीच पूर्णपणे सुटली.
(केसमधील नावे बदलली आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)