परवानगी नसतानाही गाळ्यांचा पुनर्विकास

अर्थपूर्ण संबंधानंतरच बांधकामे जोरात सुरू असल्याची चर्चा

पुणे – मार्केट यार्डातील भुसार बाजारात महापालिकेची अथवा बाजार समितीची कोणतीही लेखी परवानगी न घेता गाळ्यांचा पुनर्विकास आणि गाळ्यांचा आकार वाढविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित गाळेधारक आणि बाजार समिती प्रशासनाचे झालेल्या अर्थपूर्ण संबंधानंतरच ही बांधकामे जोरात सुरू असल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीचा पुन्हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

-Ads-

भुसार बाजारातील गाळेधारक साईड पट्ट्यांचा वापर व्यापारासाठी करत असल्याचा प्रकार पुर्वीपासून सुरू आहे. तर, गाळाधारकांनी पोटमाळ्यात स्वतःची प्रशस्त ऑफिसेस बांधली आहेत. आता बाजारातील काही गाळे पाडून पुन्हा नव्याने बांधली जात आहेत. यासाठी महापालिका अथवा बाजार समितीची कोणतेही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समितीमधील सुत्रांनी दिली. तर, काही गाळ्यांच्या भिंतींची उंची वाढवून गाळ्यांचे आकार वाढविण्याचेही जोरदार काम सुरू आहे.

किरकोळ दुरुस्तीच्या कामांना बाजार समितीची परवानगी घेणे आवश्‍यक असते. तर, मोठ्या कामांना महापालिकेची परवानगी आवश्‍यक असते. अशा बांधकामांवर संबंधित विभागप्रमुख आणि निरीक्षकांनी देखरेख ठेवणे गरजेचे असते. मात्र, या कामांपैकी काही गाळेधारक आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात अर्थ संबंधातून अनधिकृतपणे बांधकाम करत असल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये आहे.

दरम्यान, बाजार समितीकडे सुमारे 60 ते 70 गाळे दुरुस्तीच्या परवानगीसाठी अर्ज आले होते. त्यापैकी 30 ते 35 गाळेधारकांना किरकोळ दुरुस्तीसाठी परवानग्या दिल्या आहेत. मात्र, गाळा पाडून नविन गाळा बांधण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती बाजार समितीच्या स्थापत्य विभागाकडून देण्यात आली.

गाळ्यांना त्याच स्ट्रक्‍टरवर रंग देणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, भिंत पडल्यास बांधणे आदी अंतर्गत दुरुस्त्यांना परवानगी बाजार समिती देत असते. मात्र, गाळा पाडून नव्याने उभारण्यास समिती परवानगी देत नाही. अंतर्गत मागणीप्रमाणे काहींना नियमात परवानग्या दिल्या जातात. सध्या किती लोकांना परवानग्या दिल्या, याचा तपशील घेऊन माहिती देऊ. – बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)