परवडणारी घरे संकल्पनेकडे लक्ष द्यावे

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल : रचना 2019 प्रदर्शनाचे उत्साहात उद्‌घाटन

सातारा – सातारा सारख्या शहरात बीए. आय. सातारा शाखेने इतके मोठे प्रदर्शन आयोजित केल्याचे पाहून समाधान वाटले. ग्रामीण भागात परवडणारी घरे योजनेला सातारा शाखेने चांगला प्रतिसाद दिला आहे परंतु शहरी भागातील मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी “परवडणारी घरे’ या संकल्पनेवर बीए. आय. सातारा शाखेने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.

येथील जिल्हा परिषद मैदानावर बीए. आय. सातारा शाखा आयोजित “रचना 2019′ प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बीए.आय.साताराचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, उपाध्यक्ष संतोषकुमार जगताप, सेक्रेटरी नितीन माने, खजिनदार रमेश उबाळे, क्रेडाईचे अध्यक्ष बाळासाहेब ठक्कर, ज्योती ठक्कर, जनरल कौन्सिल मेंबर झाकीर मिर्झा आणि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. त्या सर्वांचा निश्‍चित व्यवसाय होईल. सातारासारख्या शहरात एवढे मोठे प्रदर्शन आयोजित केल्याचे पाहून आनंद वाटला.त्यांनी प्रदर्शनासाठी शुभेच्छा देऊन अशा प्रकारचे उपक्रम यापुढे सुरु रहातील अशी आशा व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, मेट्रो शहरांना लाजवेल अशा प्रकारचे प्रदर्शन बी. ए. आय. ने आयोजित करण्यात आले असून त्याचा सातारा शहरवासियांबरोबरच जिल्हावासियांनीही फायदा होईल. प्रदर्शनाच्या निमित्ताने नवीन टेक्‍नोलॉजी, नवीन संकल्पना पहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन आणि फीत कापून प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे आणि प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बीए. आय. सातारा शाखेचे अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी स्टॉलधारकांनी उत्कृष्ट सेवा आणि डिस्काऊंट देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन ओंकार शिंदे यांनी तर आभार नितीन माने यांनी मानले.

रचना 2019 प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या मैदानावर 3 फेब्रुवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ यावेळेत सुरु राहणार आहे. प्रदर्शनात नवनवीन प्रकल्पांचा माहिती, बांधकामास उपयुक्त मटेरियल्स, बांधकामाच्या वेगवेगळया पध्दती, त्यातील तंत्रज्ञान आणि मशिनरी, तसेच या अनुषंगाने अंतर्गत रचना यांची समग्र माहिती असलेले 101 स्टॉल्स आहेत. आकर्षक प्रवेशव्दार, आकर्षक मांडणी, आकर्षक डिस्काऊंट ग्राहकांना मिळणार असून प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही संयोजकांच्यावतीने करण्यात आले. यावेळी बी.ए.आय. सातारा शाखेचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, त्यांचे कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवर, के.बी.पी. कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सातारकर मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)