परळीचे पाटबंधारे कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करू नये – प्रितम मुंडे

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घेतली भेट

बीड, दि. 23 (प्रतिनिधी) – बीड पाटबंधारे विभागाचे परळी येथे असलेले अधीक्षक अभियंत्यांचे प्रकल्प मंडळ कार्यालय लातूर किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करू नये, अशी मागणी बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

मुंडे यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली. बीड जिल्हयातील विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले करून त्यावर सविस्तर चर्चा केली. पाटबंधारे विभागाचे प्रकल्प मंडळ कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून परळी वैजनाथ येथे कार्यरत आहे. हे कार्यालय लातूर येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत, असे केल्यास प्रशासकीय दृष्टीने ते सोयीचे ठरणार नाही त्यामुळे ते कार्यालय लातूर किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करू नये अशी मागणी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी या भेटीत केली. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून निर्णयावर फेरविचार करण्याचे आश्वासन त्यांना दिले.

दरम्यान, अंबाजोगाई तालुक्‍यातील धानोरा (बु.) या गावचा मांजरा प्रकल्पातंर्गत वांजरखेडा बंधारा जि.लातूर येथे असलेला बिगर सिंचन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुर करावा अशी मागणी मुंडे यांनी जलसंपदा मंञ्यांना यावेळी केली. धानोरा येथील ग्रामस्थांनी हा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली असून त्या अनुषंगाने मुंडे यांनी ही मागणी त्यांच्याकडे लावून धरली. या मागणीला देखील गिरीश महाजन यांनी हिरवा कंदील दाखविला असून लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन तेथील पाण्याची अडचण दूर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)