परप्रांतीयाकडून शेजाऱ्यास गजाने मारहाण

उरुळी देवाची येथील घटना ः मारहाण करणाऱ्यास अटक
लोणी काळभोर – रात्री शिवीगाळ का केली? अशी विचारणा शेजाऱ्यास केली असता चिडून जाऊन परप्रांतीयाने गजाने मारहाण केल्याने एकाचे डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्‍चर झाले असून त्याचे डोक्‍यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना शनिवार (दि. 12) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ऊरूळी देवाची (ता. हवेली) येथे घडली.
या मारहाणीमध्ये सुरेश शरणाप्पा वच्छा (वय 40, रा. हॉटेल जंजीराचे पाठीमागे, संपत भाडळे यांचे खोलीत, ऊरूळी देवाची, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर सरदारसिंग (मूळ रा. शालीमारबाग, गल्ली नंबर 4, रेल्वे स्टेशन नजीक, दिल्ली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. वच्छा व सिंग शेजारी राहतात. सिंग हा आपल्या पत्नीसमवेत रहातो. तो हॉटेलमध्ये काम करतो. तो सतत या ना त्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या लोकांशी भांडत असतो. शुक्रवारी (दि. 11) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुरेश वच्छा हे जेवणखान करून आपल्या कुटुंबीयांसमवेत घराचे बाहेरील अंगणात गप्पा मारत बसले असता सागर सरदार सिंग येथे आला व काहीएक कारण नसताना शिवीगाळ करू लागला. वच्छा त्यांना समजावून सांगत असताना दोघांत किरकोळ वादावादी झाली. घरमालक आल्याने या वादावर पडदा पडला.
शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुरेश वच्छा आपल्या घरासमोर उभे असताना सागर सरदार सिंग येथे आला. त्यावेळी रात्री शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली. याचा सिंग याला राग आला. त्याने शेजारी पडलेला लोखंडी गज उचलला व वच्छा यांच्या डाव्या हातावर व डोक्‍यावर जोरात मारला. डोक्‍यातून रक्त आल्याने ते जोरात ओरडले. पतीस मारहाण होत आहे, हे पाहून त्यांची पत्नी कस्तुराबाई भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही सिंग याने शिवीगाळ, दमदाटी केली. वच्छा यांच्या डोक्‍यातून मोठ्या प्रमाणात रक्त येत आहे हे पाहून तो निघून गेला.
यानंतर सुरेश वच्छा हे तक्रार देण्यासाठी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात गेले. त्यांना झालेल्या गंभीर जखमा पाहून पोलिसांनी त्यांना उपचारांसाठी ससून रूग्णालय, पुणे येथे पाठवले असता. येथील डॉक्‍टरांनी वच्छा यांचे डावे हाताच्या मनगटाजवळचे हाड फ्रॅंक्‍चर व डोक्‍यावर असलेली जखम गंभीर असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)