परप्रांतीयांच्या विरोधातील द्वेष ! (अग्रलेख)

एखाद्‌ दुसऱ्या घटनेवरून साऱ्या समाज घटकावरच हल्ले करणे हा शोभनीय प्रकार नाही. जेव्हा आपण राष्ट्रीय एकात्मता या तत्त्वाला सार्वजनिक जीवनात कमालीचे महत्त्व देतो त्यावेळी परप्रांतीयांच्या विरोधातला हा द्वेष त्यात अडथळा निर्माण करणारा ठरत असतो याचेही भान बाळगायला हवे. 

 

देशात बऱ्याच अवधीनंतर पुन्हा प्रांतिक अस्मिता आणि परप्रांतीयांच्या विरोधातील द्वेषातून निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे वातावरण पुन्हा गढूळ झाले आहे. गुजरातमध्ये एका बिहारी मजुराने तेथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाल्याने उत्तर गुजरातमधील जनतेने बिहार आणि यूपीच्या लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे त्या राज्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. हल्ल्यांचे हे प्रमाण व्यापक आहे. यूपी व बिहारी लोकांना तेथून अक्षरश: जीव मुठीत घेऊन पळावे लागले आहे. या प्रकारानंतर गुजरातच्या पोलीस महासंचालकांनी तातडीने उपाययोजना सुरू केली आणि साऱ्या राज्यातील पोलीस दल कामाला लावून हल्लेखोरांचे अटकसत्र सुरू केले आहे. सुमारे पाचशे जणांना या प्रकरणात त्यांनी अटक केली आहे. ओबीसींचे गुजरातमधील नेते अल्पेश ठाकोर यांच्या संघटनेने परप्रांतीयांच्या विरोधात हे आंदोलन सुरू केल्यामुळे या हल्ल्यांमागे कॉंग्रेसचाच हात असल्याची ओरड भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.

-Ads-

वास्तविक त्या राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राज्यात परप्रांतीयांवर मोठे हल्ले होऊनही तसा प्रकार झालाच नसल्याचा पवित्रा घेतला होता. आता हा पवित्रा उघडा पडल्यानंतर त्यांनी आता कॉंग्रेसला लक्ष्य करीत त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. तिकडे या घटनेचे उत्तर प्रदेशातही राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यूपीच्या लोकांना गुजरातमध्ये काम करू देणार नसाल तर आम्ही आता वाराणसीतून मोदींना पुन्हा निवडून देणार नाही, अशी घोषणा काही संघटनांनी केली आहे. बिहारींना लक्ष्य करण्यात आल्याने त्या राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरातमधील नेत्यांशी चर्चा करून हा प्रकार थांबवण्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे आवाहन त्या सरकारला केले आहे. यूपी आणि बिहारचे लोक हजारोंच्या संख्येने देशाच्या विविध राज्यांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहेत. त्यांचा तो हक्‍कच आहे. हे जरी खरे असले तरी त्यांच्या विरोधात विविध प्रांतात सातत्याने असंतोष निर्माण होत आहे त्या समस्येचा कसा सामना करायचा हा त्यांच्यापुढचा गंभीर प्रश्‍न आहे.

परप्रांतीयांमुळे स्थानिकांचा रोजगार बुडतो ही एक सार्वत्रिक ओरड आहे. पण यूपी आणि बिहारी लोक कमी पैशात मेहनतीचे मोठे काम करतात त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे प्रमाणही मोठे आहे. कपडे इस्त्री करण्यापासून ते बांधकामांवर मोलमजुरी करण्यापर्यंतची अनेक मेहनतीची कामे हे लोक करीत असतात. राजस्थानी लोक व्यापार करून दुसऱ्या प्रांतात फार लवकर बस्तान बसवतात पण ही यूपी, बिहारची मंडळी मात्र मोलमजुरीलाच प्राधान्य देत असतात. राजकीय संघटनांना आपले हातपाय पसरण्यासाठी परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवणे हा अलीकडच्या काळातील एक सोपा मार्ग झाला आहे. त्यातून फार लवकर राजकीय बस्तान बसते आणि स्थानिकांची मोठ्या प्रमाणात सहानभूती आणि पाठिंबा मिळतो असा एक सर्वसाधारण समज देशातील काही संघटना आणि प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाला आहे. भृमीपुत्रांचा लढा वगैरे शब्दप्रयोग यासाठी वापरले जातात. तथापी प्रांतिक अस्मितांच्या नावाने परप्रांतीयावर हल्ला करणे हा शूरपणा ठरत नाही. निदान गुजरातेतील लोकांना तरी हा प्रकार शोभणारा नाही. कारण गुजराती समाजही फार मोठ्या प्रमाणावर तेथून देशाच्या अन्य भागात खूप पिढ्या आधीपासूनच स्थलांतरित झाला आहे. केवळ गुजरातीच नव्हे तर राजस्थानी समाजाचेही व्यावसायिक स्थलांतर मोठे आहे. एकेक व्यवसाय एकेका प्रांतातल्या लोकांनी पूर्ण व्यापून टाकल्याची अनेक उदाहरणे सर्व देशभर आहेत. उदाहरणार्थ, टायर आणि पंक्‍चर काढण्याच्या व्यवसायावर केरळींचे वर्चस्व आहे, हॉटेल व्यवसायावर दक्षिण भारतीयांचे वर्चस्व आहे. असा हा सार्वत्रिक मामला आहे.

एखाद दुसऱ्या घटनेवरून साऱ्या समाज घटकावरच हल्ले करणे हा शोभनीय प्रकार नाही. आपल्या देशातलेही बरेच लोक आखाती देशात, अमेरिकेत वगैरे नोकरी, व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. उद्या तेथेही असेच प्रकार सुरू झाले तर आपण काय करणार? याचाही विचार व्हायला हवा आहे. या प्रकरणाला ही जशी बाजू आहे तशीच परप्रांतीयांनीही संघटितपणे एखाद्या भागावर आपले वर्चस्व आणि दादागिरी निर्माण होता कामा नये याचीही काळजी घ्यायला हवी. संजय निरूपम सारखा एखादा जबाबदार नेता जर आम्ही उत्तर भारतीयांनी काम थांबवले तर मुंबई बंद पडेल असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातून मुजोरीच झळकत असते. असल्या वायफळपणाला त्या लोकांनीही आवर घातला पाहिजे. जेव्हा आपण राष्ट्रीय एकात्मता या तत्त्वाला सार्वजनिक जीवनात कमालीचे महत्त्व देतो त्यावेळी परप्रांतीयांच्या विरोधातला हा द्वेष त्यात अडथळा निर्माण करणारा ठरत असतो याचेही भान बाळगायला हवे. प्रत्येक मुद्द्यावरून पक्षीय राजकारण सुरू करणे हेही काही प्रगल्भतेचे लक्षण ठरत नाही. गुजरातमधील परप्रांतीयावरील हल्ले हा तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचा व राज्य सरकारच्या अपयशाचा विषय आहे. ती व्यवस्था नीट ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी भाजपने कॉंग्रेसच्या नावाने देशभर खडे फोडण्याचे काम सुरू करणे हाही एक नाठाळपणाच आहे. कारण कोणतेही असो सामाजिक द्वेषाचे वातावरण नुकसानकारकच असते हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)