परदेशी शिष्यवृत्तीतून ओबीसींना वगळले 

ओबीसी संघटना तीव्र आंदोलन उभारणार – प्रा.लक्ष्मण गुंजाळ 

बीड –
राज्य सरकार ओबीसींसाठी काही योजना जाहीर करत असून या योजनांचा फायदा लोकांना होण्या अगोदरच त्या मागे घेतल्या जातात. एका हाताने देणे आणि दुसर्‍या हाताने घेणे ही बाब ओबीसींच्या बाबतीत सरकार करत असल्याचा घणाघाती आरोप अखिल भारतीय माळी महासंघाचे राज्य प्रवक्ते प्रा.लक्ष्मण गुंजाळ यांनी केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. 20 ऑगस्ट 2018 रोजी राज्य शासनाने ओबीसींना परदेशी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार खुल्या प्रवर्गाबरोबरच अन्य मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी खुल्या प्रवर्गातील 10 आणि इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जाती, विशेष मागास वर्ग यांच्यासाठी 10 जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झाला. यापैकी 30 टक्के मुलींसाठी राखीव ठेवण्याचाही निर्णय झाला. दरवर्षी 20 कोटी रुपयांची तरदुत करण्याचे जाहीर करण्यात आले. तथापी 8 ऑक्टोबर 2018 रोजी राज्य शासनाने उच्च शिक्षणासाठी जी जाहीरात प्रकाशीत केली. त्या जाहीरातीमध्ये सर्व जागा खुल्या दर्शविण्यात आल्या. अर्थात परदेशी शिष्यवृत्तीतून ओबीसींना वगळण्यात आले आहे. हा ओबीसी व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्यायच केला असल्याचा घणाघाती आरोप प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी केला आहे.

परदेशी शिष्यवृत्तीतून 20 ही जागा खुल्या प्रवर्गाला ठेवण्याच्या राज्य सरकारच्या अन्यायी धोरणाविरुध्द महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या विविध संघटना तीव्र आंदोलन उभारणार असल्याचेही शेवटी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. या प्रसिध्दी पत्रकावर प्रा. लक्ष्मण गुंजाळ, संदीप उपरे, यांच्यासह गणेश जगताप, अजिंक्य आनेराव, गुलाब चव्हाण, प्रकाश कानगावकर, अंकुश निर्मळ, प्रा.बी.के.माने, गीताराम खेडकर, संजय गुरव, अर्जुन दळे, प्रा. कैलास लगड, किशोर राऊत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)