परदेशी गुंतवणूकदार सावध, म्युच्युअल फंड जोरात

अनेक कारणांनी भारतीय बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे तो खाली आला आहे. अशावेळी भारतीय म्युच्युअल फंड मोठी खरेदी करत असून बाजार सुधारला की त्या माध्यमातून त्याची फळे भारतीय गुंतवणूकदारांना मिळणार आहेत.

सध्या शेअरबाजारात अस्थिरता असली तरी चालू महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर बाजारात सुमारे 11,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याचवेळी या कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे 19,084 कोटी रुपये काढून घेतले आहेत.

सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापकांनी 11,600 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले तर याच महिन्यात परकीय गुंतवणूक संस्थांनी 10,825 कोटी रुपये काढून घेतले होते. परकीय गुंतवणूक संस्थांनी केलेल्या विक्री म्हणजे देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी खरेदीसाठीची संधी ठरली. 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत फंड व्यवस्थापकांनी 11,091 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परदेशी गुंतवणूक संस्थांनी विक्रीची भूमिका घेतली असली तरी देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी मात्र खरेदी करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. दोन्हींच्या दृष्टीकोनातील हा फरक आहे. कारण परदेशी गुंतवणूक संस्थांसाठी त्यांच्या पोर्टफोलिओमधील भारतातील गुंतवणूक ही अनेक साधनांपैकी एक असते. या संस्था कायम अन्य देशातील शेअर बाजार आणि भारतातील शेअर बाजाराची तुलना करून जोखीम-परताव्याचे समीकरण मांडत असतात. हे समीकरण सकारात्मक येत नसेल तर भारतातील गुंतवणूक कमी करण्यास या संस्था मागेपुढे पहात ऩाहीत. रुपयाची घसरण, कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किंमती, जागतिक व्यापारयुद्ध आणि या सगळ्याचा अर्थकारणावर होणारा व्यापक परिणाम यामुळे परकीय गुंतवणूक संस्था त्यांची भारतातील गुंतवणूक गेल्या काही महिन्यात कमी करत आहेत. देशातील म्युच्युअल फंडांसमोर मात्र अशी स्थिती नाही. उलट करेक्शनच्या काळात त्यांच्यासाठी ही एक गुंतवणुकीची संधी ठरत आहे. एसआयपीद्वारे त्यांच्याकडे दर महिन्याला रक्कम जमा होत आहे आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा त्यांच्यासमोरील योग्य पर्याय आहे.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)