परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे परतू लागले

सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर निर्देशकांत वाढ

सरलेल्या आठवड्यात एफआयआयकडून 1380 कोटींची खरेदी

मुंबई: भारतातील कंपन्यांची मंदावलेली उत्पादकता पुन्हा वाढण्याची स्पष्ट लक्षणे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे फार मोठा परिणाम होण्याची शक्‍यता कमी झाली असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजाराकडे वळू लागले आहेत. या कारणामुळे निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही या आठवड्यात शेअर बाजार निर्देशांक वाढल्याचे दिसून आले. या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1380 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांकडून मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे खरेदी मंदावली आहे.

गेल्या तीन आठवड्यापासून निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 313 अंकानी म्हणजे 0.83 अंकानी वाढून 37869 अंकावर बंद झाला. त्या अगोदर सेन्सेक्‍सने 38 हजाराची पातळी गाठली होती. गेल्या दोन आठवड्यात सेन्सेक्‍स तब्बल 1059 अंकानी म्हणजे 2.89 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या आठवड्यात 68 अंकानी म्हणजे 0.60 अंकानी वाढून 11429 अंकावर बंद झाला.

या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या कामगीरीचे कौतूक केले आहे. भारताची अर्थव्यवस्था आता प्रदीर्घ काळ अधिक विकास दर गाठण्याचे संकेत नाणेनिधीने दिले आहेत. त्याचबरोबर या आठवड्यात औद्योगिक उत्पादन वाढून 7 टक्‍क्‍यांवर गेल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या अगोदर पायाभूत सुविधांची उत्पादकता वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास वाढत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
या आठवड्यात ग्राहक वस्तू क्षेत्राच्या कंपन्याच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

पाऊस चांगला पडल्यामुळे ग्राहक वस्तूंची विक्री वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील सर्व कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. बॅंका, धातू, रिऍल्टी, माहीत तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची विक्री वाढून या क्षेत्राचे निर्देशांक वाढले. वाहन कंपन्याच्या शेअरलाही या आठवड्यात मागणी होती. जरी शुक्रवारी गेल्या महिन्यात प्रवाशी वाहनांच्या विक्रीत घट झाली असल्याची आकडेवारी जाहीर झाली असली तरी या क्षेत्राची उत्पादकता वाढणार असल्याचे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. भांडवली वस्तू आणि उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मात्र गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी विक्री केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)