परदेशात गोलंदाजी करायला शिकलो- महंमद शमी

लंडन: यापूर्वी परदेशातील खेळपट्ट्यांवर मारा करताना मला अडचणी येत असत. परंतु इंग्लंडच्या दौऱ्यात माझ्यात बरीच सुधारणा झाली असून आता मी परदेशात प्रभावी गोलंदाजी करायला शिकलो आहे, असा विश्‍वास भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमीने व्यक्‍त केला आहे.

शमीची कारकीर्द आणि त्याची कामगिरीही सातत्यपूर्ण नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तर त्याची कामगिरी निराशाजनकच होती. त्यातच गेल्या दीड-दोन वर्षांत शमीला कौटुंबिक आणि वैयक्‍तिक स्तरावर अनेक वादळांमधून जावे लागले. त्यामुळेही त्याच्या कामगिरीवर परिणाम झालाच. या वेळच्या इंग्लंड दौऱ्यात मात्र शमीने आपल्या कामगिरीत सुधारणा केली असून पाच कसोटी सामन्यांतून 16 बळी घेताना आपला ठसाही उमटविला आहे.

स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन या इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांच्या चित्रफितींचा अभ्यास करून ते इंग्लिश हवामान आणि खेळपट्ट्यांचा कसा फायदा उठवितात, हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला, असे सांगून शमी म्हणाला की, 2014 च्या तुलनेत यंदाच्या दौऱ्यातील माझ्या गोलंदाजीत खूपच सुधारणा झाली असल्याचे तुम्हाला ध्यानात येईल. त्या वेळी मला पुरेसा अनुभव नव्हता, तसेच मी परिपक्‍व झालो नव्हतो. परंतु अनुभवातून मला बरेच शिकायला मिळाले.

विशेषत: परदेशात कशी गोलंदाजी करावी आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, याबाबत मी खूप काही शिकलो आहे, असे सांगून शमी म्हणाला की, ब्रॉड आणि अँडरसन हे दोघे इंग्लंडमध्ये कोणत्या टप्प्यावर मारा करतात, त्यांची दिशा कशी असते, चेंडू नवा असताना आणि नंतर जुना जाल्यावर वेगात कसा बदल करतात, या साऱ्याचे मी बारकाईने निरीक्षण केले. त्याचा मला निश्‍चितच फायदा झाला.

मोईनने पाचव्या कसोटीतील पहिल्या डावांत जीव तोडून गोलंदाजी करूनही त्याला एकही बळी मिळाला नाही. त्याने मोईन अलीला अनेकदा चकविले, मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. दुसऱ्या डावांत शमीने 110 धावांत 2 बळी घेतले असून भारताचे अन्य गोलंदाजही अपयशी ठरल्यामुळे इंग्लंडने भारतासमोर 464 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान ठेवले आहे.
परंतु खेळाडू कितीही चांगला असला, तरी त्याला नशिबाची साथ लागतेच, असे सांगून शमी म्हणाला की, अचूक टप्पा व दिशा राखून मारा करणे हेच गोलंदाजाचे पहिले लक्ष्य असते. बळी मिळेल किंवा नाही हे नशिबावर अवलंबून असते. मोईन आणि कूकला मी अनेकदा चकविले परंतु मला नशिबाने कौल दिला नाही. तरीही मला जे काही यश मिळाले आहे, त्यावर मी समाधानी आहे.

ईशांतचा घोटा दुखावल्यामुळे पाचव्या कसोटीतील दुसऱ्या डावांत शमी आणि बुमराह यांच्यावर ताण पडला. जडेजाने तर 47 षटके टाकत गोलंदाजीचा भार वाहिला. हनुमा विहारीने 3 बळी घेत त्यात वाटा उचलला. परंतु अशा परिस्थितीत एका गोलंदाजाला दुखापत झाल्यास संघ निश्‍चितच अडचणीत सापडतो, असे शमीने नमूद केले. संघनिवड करताना प्रत्येक गोलंदाज विशिष्ट जबाबदारी देऊन निवडण्यात येतो. त्यातच प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यास कोणत्याही संघासमोर समस्या उभी राहणारच असे त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)