परदेशातून “राफेल’ खरेदी का?

भाजपमुळे उद्योगांना खीळ: शरद पवार यांची टीका

पिंपरी – भाजपचे सरकार हे देशातील उद्योगांना खीळ घालून परदेशातील उद्योग कंपनीचा विकास करत आहे. यातूनच “राफेल’ सारखे प्रकरण देशात घडत आहे. देशात विमान व त्याचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या असताना फ्रान्समधून विमान खरेदी सरकारने का केली? हा माझा मोदी सरकारला सवाल आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पावर यांनी शनिवारी (दि.3) रहाटणी येथे कामगार मेळाव्यात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रहाटणी येथे कामगार मेळाव्याचे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजन केले होते. या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्याचे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, “आयटीयू’चे सचीव अजित अभ्यंकर, कामगार संघटन तज्ज्ञ सल्लागार अरविंद श्रोत्री, पुणे जिल्हा इंटक अध्यक्ष कैलास कदम, पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधीकारी उपास्थित होते.

पवार म्हणाले की, केंद्र सराकार व राज्य सरकार हे देशी उद्योगांच्या मूळावर उटले असून, ते परदेशी व खासगी कंपन्यांना उभारी देत आहे. केंद्रीय गृहमंत्री असताना यशवंत चव्हाण यांनी नाशिक, लखनउ, बॅंगलोर येथे विमानाचे पार्ट बनवणारे कारखाने तयार केले व त्यातून मीग विमान निर्माण केले ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापर्यंत देशाचे संरक्षण करत होते, असे असतानाही मोदी सरकार मात्र विमान खरेदी फ्रान्समधून का करते? देशात कारखानदारी पूर्णपणे थांबली असल्यामुळे सध्या रोजगार नाहीत. त्यामुळे अनेक हात आजही बेरोजगार आहेत. तर जे कामगार काम करत आहेत त्यांना कंत्राटीकरण व “निम’ सारख्या कायद्याचे गृहण लागले आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करणाऱ्या ऑर्डीनन्समध्येही खासगीकरण हे सरकार करत आहे. जे देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. उद्या यातून देशाच्या शत्रूंना आरामात सर्व गुप्त माहिती मिळू शकते. याला जबाबदार कोण?, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित सर्व कामगार नेत्यांनी तज्ज्ञांनी सरकारच्या निम कायद्याला विरोध करत कंत्राटीकरणद्वारे कामगारांची होणारी पिळवणूक थांबावी. यासाठी आपापली मते मांडली.

पुतळ्यांना विरोध नाही पण…
देशात उत्पादन निर्मितीला हे सरकार खीळ घालत आहे. हाच विचार पिंपरी-चिंचवडच्या बाबतीत स्व. अण्णासाहेब मगर यांनी केला असता, तर उद्योगनगरी उभा राहिली नसती. मोदी “स्मार्ट सिटी’ तयार करतील, तेव्हा करतील पण पिंपरी-चिंचवड आज पाहिले तर गेल्या दहा वर्षांत सर्वांनी पक्ष विसरून शहरात काम केले म्हणून आधीच शहर स्मार्ट झाले आहे. हिंजवडी सारखे आयटी पार्क उभे राहिले आहे. मोदी सरकार मात्र या उद्योगांना बळकटी द्यायचे सोडून केंद्र सरकारच्याच कंपन्यांकडून 80 हजार कोटी उभे करुन मोठ-मोठे पुतळे उभारत आहेत. माझा पटेलांच्या पुतळ्याला विरोध नाही, मात्र कंपन्याकडून पैसे घेण्यापेक्षा तो राज्य सरकारकडून का नाही घेतला. कंपन्यांचा पैसा कामगारासांठी असपासच्या प्रदेशाच्या विकासासाठी मोदी वापरु शकले असते, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.

जानेवारीमध्ये देशव्यापी कामगार आंदोलन…
सरकारला कामगारांच्या प्रश्‍नावर चर्चा करायला वेळ नाही, तर हे सरकार त्याच आंदोलनकर्त्या कामगरांवर खटले भरत आहे. त्यांनी अनेक कामगारांना घरी पाठवण्याचा घाट घातला होता. याविरोधात येत्या 8 व 9 जानेवारीला देशव्यापी कामगार आदोलन होणार आहे. यावेळी गरज भासली, तर मी स्वतः देखील तुमच्या सोबत सरकारकडे येईन व कामगारांच्या मागण्या मांडेन, असे आश्‍वासनही शरद पवार यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)