परदेशांतून होणारी प्राणी तस्करी रोखणार कशी?

नियमांचेच अडथळे : पर्यावरणप्रेमी, प्रशासनासमोर आव्हान

– गायत्री वाजपेयी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – अधिक पैसे मिळविण्यासाठी विदेशातून प्राणी-पक्ष्यांची अवैध तस्करी होत असते. मात्र, अनेकदा हे प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीत नसल्याने या तस्करीबाबत वन्यप्राणी संवर्धन कायद्यांतर्गत गुन्हाची नोंद होत नाही. केवळ दंड आकारून कायदेशीर कारवाई होत असल्याने या तस्करबहाद्दरांना लगाम घालण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, परदेशातून होणारी वन्यप्राण्यांची वाढती तस्करी हे एक मोठे आव्हान पर्यावरणप्रेमी आणि शासकीय यंत्रणांसमोर आहे.

अंधश्रद्धा, औषधी उपयुक्‍तता, हौस अशा विविध कारणांसाठी वन्यप्राण्यांची तस्करी होत असते. यामध्ये प्रामुख्याने कासव, मांडूळ, विविध पक्ष्यांसह अनेक जीवांचा यात समावेश आहे. देशांतर्गतच नव्हे, तर विदेशातूनही ही तस्करी मोठ्या प्रमाणात होते. जागतिक संस्थांनी तसेच भारताच्या वन्यप्राणी संवर्धन कायद्यांतर्गत प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध कायदे केले आहेत. तसेच अस्तित्वाचा धोका असणाऱ्या प्राण्यांची एक संरक्षित यादीदेखील तयार करण्यात आली आहे. यातील प्राण्यांना इजा पोहचविणे, त्यांना कैद करणे, तस्करी अथवा त्यांना मारून टाकणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊन शिक्षादेखील सुनावण्यात येते. मात्र, सध्या तस्करी होत असलेल्या प्राण्यांपैकी बहुतांश प्राणी हे “संरक्षित’ यादीत समाविष्ट नसल्याने दोषींवर कारवाई करावी कशी? असा प्रश्‍न वनविभागासमोर आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राण्यांच्या तस्कारीबाबत महसूल विभाग कारवाई करते. मात्र, ही कारवाई केवळ त्या प्राणी-पक्ष्यांना ताब्यात घेऊन, दोषी व्यक्तींना पैशांच्या रुपात दंड ठोठावण्यापुरतीच आहे. दंडाची रक्कमदेखील अनेकदा कमी असते. त्यामुळे तस्कर बहाद्दर अगदी सहजपणे सुटतात. परंतु, यातून तस्करीचा प्रश्‍न तसाच राहतो. कडक कारवाईअभावी ही तस्करी वाढत असून प्रशासकीय यंत्रणांसमोर हे एक मोठे आव्हान ठरत आहे.

अशी आहे प्रशासकीय कारवाई
महसूल विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात कोलकाता येथून 35 एक्‍झॉटिक बर्ड, मुंबई येथून 523 “स्टार’ प्रजातीचे कासव, 8000 किलो शार्कचे कल्ले ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात 45 कोटी इतकी किंमत आहे. नुकतीच पुण्यातून 15 विविध प्रजातींचे पक्षी ताब्यात घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त हरिण, वाघ, बिबट्या, खवले मांजर यांचीदेखील तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.

या कारणांसाठी होते प्राण्यांची तस्करी :
– कासव, मांडूळ : हे प्राणी घरात ठेवल्याने धनलाभ होतो, अशी समज आहे. भारतील कासवांची तस्करी होतेच परंतु त्यांना पकडण्याचा कालावधी अल्प असल्याने सिंगापूर, मलेशिया याठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

– खवले मांजर : आपल्या नक्षीदार खवल्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या प्राण्याचे खवले हेच त्याचे शत्रू बनत आहे. या खवल्यांच्या औषधांसाठी उपयोग होत असल्याने या प्राण्यांची तस्करी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राण्याला भरपूर मागणी आहे.

– वाघ, बिबट्या : यांच्या त्ववेच्या उपयोग सजावट साहित्यात होतो. तर नखे व दातांचा वापर दागिने, शस्त्र यांमध्ये केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)