परखंदी पाझर तलावाची राजकीय श्रेयवादामुळे दयनीय अवस्था 

प्रशासनालाही फुटेना पाझर भाग – १

टंचाईमुळे ग्रामस्थांवर वणवण करण्याची वेळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनंजय घोडके

वाई – वाई तालुक्‍यातील सर्वाधिक खोली असलेला पाझर तलाव म्हणून ओळख असलेल्या परखंदी तलावात गळतीमुळे पाणीच साठत नाही. या तलावातील गाळ आणि गळती काढणे गरजेचे असतानाही केवळ राजकीय श्रेयवादात या तलावाची दुरुस्ती अडकली आहे. मात्र, दुरुस्ती होत नसल्याने पाणी साठत नाही, आणि पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने एकंदरीतच सर्वसामान्य शेतकऱ्यांची फरफट होत आहे.

परखंदी येथील पाझर तलावाची सध्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यास निव्वळ राजकीय श्रेयवाद कारणीभूत ठरत आहे. तलावाच्या दुरुस्ती कामाचे श्रेय कोण घेणार, यावरून पाझर तलावाबरोबर सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण, संपूर्ण गाव मात्र कॉंग्रेस विचाराचे आहे, त्यामुळे पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग हा राजकीय श्रेयवादाचा फायदा घेत पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात दिरंगाई करीत आहे. परखंदी तलावातील गाळ व गळती योग्य पध्दतीने व गांभीर्याने काढल्यास हजारो हेक्‍टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी मदत मिळणार आहे. परखंदी हे मांढरदेवीच्या कुशीत वसलेले गाव असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले आहे.

पाण्याचा साठा योग्य पध्दतीने करण्याचे साधन उपलब्ध नसल्याने या परखंदी परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून भरीव काम न झाल्याने पडणारे पावसाचे पाणी सरळ वाहून जाते. तसेच परखंदी पाझर तलावाचे काम श्रेयवादा बरोबर भ्रेष्ट कारभारात अडकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. अतिवृष्टी असलेल्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवावे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन पणामुळे कष्टकरी शेतकरी व परिसरातील पाळीव जनावरे, पक्षी, जंगली प्राणी, यांची परवड होत आहे.

पाझर तलावाला प्रचंड गळती असल्याने काही शेतकऱ्यांनी तलावाशेजारीच विहिरी काढण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी थांबविणे काही अंशी शक्‍य होईल. या पाझर तलावाची गळती काढण्याचे काम किसनवीर कारखान्याच्या व्यवस्थापनाणे करण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाही यश आले नाही. पाणीपुरवठा विभागाकडूनच तकलादू बांधकाम झाल्याने दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारा निधी पाण्याबरोबर वाहत जात आहे,

तरी संबंधित विभागाने काळजीपूर्वक या पाझर तलावाची गळती व गाळ काढल्यास या भागातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायस्वरूपी निकालात निघण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करताना दिसत आहेत. दरवर्षी दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नसल्याने पाझर तलाव झाडा-झुडपांच्या गर्तेत अडकलेला आहे. तलावाच्या भिंतीवरूनच परिसरातील शेतकरी ये-जा करीत असल्याने पाझर तलावाच्या बांधकामालाच धोका पोहोचण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी झटकले हात
पाझर तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे माहिती घेतली असता तालुक्‍यातील पाझर तलावांचा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाशी काहीही संबंध नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे पाझर तलावांना कोणी वाली आहे का? असा संतापजनक प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, ऐन टंचाईत पाझर तलावांकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वसामान्य मात्र हतबल झाले आहेत.

ग्रामपंचायतीनेही ठोस पावले उचलणे गरजेचे
परखंदी ग्रामपंचायतीने पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलून उपाय योजना करण्याची गरज आहे. पाणीपुरवठा विभाग तलावाच्या नादुरुस्तीला जबाबदार आहेच, परंतु ग्रामपंचायतीची स्वतःचीही काही जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. एकंदरीत परखंदी पाझर तलावाच्या गळतीला गावासह पाणीपुरवठा विभाग व भ्रष्ट ठेकेदार यांना जबाबदार धरून सर्वांनी एकत्रितपणे या तलावाच्या गळती काढण्याच्या कामात सहभाग नोंदविल्यास या पाझर तलावात प्रचंड पाणीसाठा होऊन या परिसराचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटेल, हे सांगण्यासाठी कोणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)