परंपरेच्या बंधनात रंगत नात्यांची – ‘घाडगे & सून’ !

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नं, ज्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नवीन नात्यांसोबत येणाऱ्या अपेक्षा, बंधनं, कुटुंबाची परंपरा जपत सासरच्या सदस्यांच्या मनात तिला स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण करायाच असतं. अशीच एक सामान्य घरातून आलेली मुलगी परंपरा आणि रुढींमध्ये अडकलेल्या सासरला कसं आपलसं करून घेईल? हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठीच्या नव्या मालिकेमध्ये. टेल अ टेल मिडिया निर्मित (जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे) परंपरेच्या कोंदणात नात्यांची रंगत या कथासूत्रावर आधारित “घाडगे & सून” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे १४ ऑगस्टपासून.  प्रभावशाली संवादफेक आणि त्याला उत्कृष्ट अभिनय जोड असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने मालिकेमध्ये माई घाडगे ही व्यक्तीरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत अतिशा नाईक, चिन्मय उदगीरकर आणि निवोदित भाग्यश्री लिमये, उदय सबनीस, प्रफुल्ल सामंत प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

घरातील बायकांनी चूल – मुल सांभाळावं, त्यांनी नोकरी करू नये असा समज असलेले घाडगे कुटुंब ज्या घरामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. घाडगे कुटुंबाचा वडिलोपार्जित दागिन्यांचा व्यवसाय आहे तो म्हणजे “घाडगे & सन”, ज्याचा कारभार घरातील पुरुष मंडळी सांभाळत आहेत. कुटुंबाची सर्वेसर्वा स्वभावाने कणखर, परंपरेचा पगडा घेऊन आयुष्यभर जगलेली, स्पष्टवक्ती, जीच्या शब्दाला संपूर्ण घर मान देते, जीचे आपल्या कुटुंबावर प्रंचड प्रेम आहे अशी आजी म्हणजे माई घाडगे. तसेच दुसऱ्या बाजूला अमृता प्रभुणे जी आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, तीचं लग्न माई घाडगे यांच्या नातवाशी म्हणजेच अक्षय घाडगे याच्याशी होतं जो अतिशय गोंधळलेला, जुन्या विचारांच्या कुटंबामध्ये पार अडकून गेलेला आहे. या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नाही कारण दोघांचीही स्वप्न वेगळी आहेत, ध्येय वेगळी आहेत, तरीही हे दोघं लग्नबंधनात अडकतात. आता या कुटुंबामध्ये लग्न होऊन आल्यावर कशी अमृता माई घाडगे म्हणजेच आपल्या आज्येसासूचं मनं जिंकते, कसं त्या परिवाराला आपलसं करते, त्यांचं मतपरिवर्तन करते आणि ज्या परिवारात बायकांनी नोकरी करणे, व्यवसाय सांभाळणे मान्य नाही त्या घराचा वडिलोपार्जित व्यवसाय ती कशी सांभाळते, कसा त्यांचा व्यवसाय पुढे नेते, हे बघणं नक्कीच रंजक असणार आहे. “घाडगे & सन”च “घाडगे & सून” होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे “घाडगे & सून” ज्यामध्ये नातं सून आणि आज्ये सासूचं एक वेगळ नातं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने कलर्स मराठी प्रमुख, व्हायाकॉम -18 चे निखील साने म्हणाले, ‘घाडगे & सून’ या मालिकेमध्ये सुकन्या मोने महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मी सुकन्या मोनेंबरोबर याआधी बरेच काम केले आहे, प्रेक्षकांनी त्यांना बऱ्याच भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्यांना भरभरून प्रेमं देखील दिले आहे. या मालिकेनिमित्त त्या पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे आशा आहे प्रेक्षक या वेळेसदेखील तसच प्रेम देतील. एखाद्या पात्राशी सहज समरस होऊन ते पात्र जिवंतपणे सादर करण्याचे कौशल्य हे सुकन्या मध्ये आहे. तिने सादर केलेले कुठलेही पात्र हे प्रेक्षकांना सहज प्रेक्षकांच्या मनात रुजतं आणि हवहवस वाटतं. प्रेक्षकांना ते पात्र आपल्यातलच एक आहे अस वाटण हि कलाकाराची अभिनय क्षमता असते आणि ती सुकन्यामध्ये निश्चित आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि सहज विविध भूमिका साकारणारी सुकन्या हि एक गुणी कलाकार आहे. मालिकेबद्दल सांगायचं झाल तर, परंपरेमध्ये बांधलेले असूनही आपल्या माणसांना न दुखावता आपुलकीने कशी त्यांची मनं जिंकता येतात हे ‘घाडगे & सून’ या नव्या मालिकेतून आम्ही दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आमची खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)