‘पप्पांनी वायरने गळा दाबून आईला मोरीत टाकले’

खूनाचा उलगडा : दारुड्या बापाची कर्मकहाणी सांगितली चिमुकलीने

पिंपरी – ‘पप्पा दारू पिऊन आईशी भांडले. आईला आणि आम्हाला खूप मारले. आम्ही जेवण करत असताना पप्पांनी आमचे जेवणाचे ताट फेकून दिले. रात्रीही पप्पांनी आम्हाला जेवण करू दिले नाही. त्यानंतर रात्री पप्पांनी निळ्या वायरने आईचा गळा दाबला. आई खाली पडली आणि पप्पांनी तिला उचलून मोरीत टाकले. दरवाजाची कडी बाहेरून लावून निघून गेले.’ अशी हृदय हेलावणारी कहाणी दहा वर्षांची चिमुरडी आपल्या मामाला सांगत असताना उपस्थितांचेही डोळी पाणावले. दारुड्या बापाने मुलांसमोरच त्यांच्या आईचा खून केल्याचे चिमुकलीच्या जबाबानंतर उघड झाले आणि खुनाचा उलगडा झाला

रहाटणी येथे पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केला. ही घटना रहाटणी येथे आज (गुरुवारी) पहाटे घडली. याप्रकरणी पुंडलिक शामराव वाघमारे (वय 34, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उत्तम महादू जाधव (वय 36, रा. रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिक यांची बहीण वंदना आणि आरोपी तिचा पती उत्तम यांच्यामध्ये वारंवार भांडण होत असे. उत्तमला दारूचे व्यसन आहे. त्यांना दीपाली जाधव (वय 10) आणि ओंकार जाधव (वय 8) ही दोन मुले आहे. दररोज किरकोळ कारणांवरून उत्तम पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण करीत असे. वंदना रहाटणी परिसरात धुण्या-भांड्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होती.

गुरुवारी पहाटे पुंडलिक यांना त्यांच्या भावाने सांगितले की, ‘वंदनाच्या घरी भांडण झाले आहे.’ त्यानुसार दोघेही तात्काळ वंदना यांच्या घरी आले. त्यावेळी वंदना मोरीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. पुंडलिक आणि त्यांच्या भावाने वंदना यांना कारमधून नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना औंध रुग्णालयात नेण्यास सांगितले. दरम्यान पुंडलिक यांच्या भावाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. औंध रुग्णालयात डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच वंदना यांना मयत घोषित केले. चिमुकल्या दिपालीने घडलेला प्रकार मामाला सांगितला आणि खुनाचा उलगडला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)