पनामा प्रकरणी शरीफ यांनी तपास अहवाल फेटाळला

तपासात शरीफ आणि कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचा ठपका

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला पुन्हा सुरुवात

इस्लामाबाद- पनामा गैरव्यवहार प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात तपास करणाऱ्या संयुक्‍त तपास पथकाचा अहवाल शरीफ यांच्या वकिलांनी फेटाळला आहे. हा अहवाल एकतर्फी आणि बेकायदेशीर असल्याचे शरीफ यांच्या वकिलांच्या टीमने म्हटले आहे. शरीफ आणि त्यांच्या मुलांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण दाखल करण्यात यावे, अशी शिफारस या तपास अहवालामध्ये करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने पनामा गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी आजपासून पुन्हा सुरु केली आहे. या प्रकरणी शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवरील आरोपांची तपासनी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात आलेल्या 6 सदस्यीय संयुक्‍त तपास पथकाने आपला अहवाल 10 जुलैरोजीच सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. मात्र या अहवालामध्ये शरीफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने शरीफ यांच्या वकिलांनी अहवालाच्या वैधतेलाच आव्हान दिले आहे. हे तपास पथकच बेकायदेशीर असल्याने पथकाचा अहवालही बेकायदेशीर आणि राज्यघटनेचे उल्लंघन करणारा असल्याचे शरीफ यांचे वकिल ख्वाजा हॅरिस यांनी सांगितले. या तपासासाठी विदेशातून मागवण्यात आलेली कागदपत्रेही देशाच्या कायद्याविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

संयुक्‍त तपास पथकाच्या विनंतीवरून या अहवालाचा भाग 10 गोपनीय राखण्यात आला आहे. हा भाग उघड करण्याची आणि संपूर्ण अहवाल फेटाळण्याची मागणीही ख्वाजा हॅरिस यांनी केली. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सरकारला मान्य असेल असे प्रसारण राज्यमंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले.
विरोधकांकडून तपास अहवालाचे स्वागत
दुसरीकडे “पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’ पक्षाचे इम्रान खान यांच्या वकिलांनी मात्र या अहवालाचे स्वागतच केले आहे आणि या अहवालाच्या अंमलबजावणीची मागणी केली. देशातील अन्य प्रमुख विरोधी राजकेय पक्षांनीही तपास अहवालाचे स्वागत केले आहे. शरीफ यांनी राजीनामा द्यावा आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्‍त होईपर्यंत राजकारणापासून दूर रहावे, असे या राजकीय विरोधकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)