पनामागेट प्रकरणात शरीफ यांना तात्पुरता दिलासा

  • पुरेसे पुरावे नसल्याने पंतप्रधान पद सोडण्याची गरज नाही
  • संपूर्ण व्यवहार तपासण्यासाठी संयुक्‍त तपास पथक नियुक्‍त होणार
  • सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आज “पनामागेट’ प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. शरीफ यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांना पदावरून हटवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र त्याबरोबर “पनामा’ प्रकरणात शरीफ कुट्रुंबियांची चौकशी करण्यासाठी एक संयुक्‍त पथक नियुक्‍त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
नवाझ शरीफ 1990 मध्ये दोनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. त्यावेळी त्यांनी लंडनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेचा तपशील गेल्यावर्षी उघड झालेल्या पनामा पेपर्समध्ये सापडला होता. लंडनमधील मालमत्तेचे व्यवहार काही विदेशी कंपन्यांमार्फत केले जातात आणि या परदेशातील कंपन्यांची मालकी शरीफ यांच्या मुलांच्या नावे असल्याचे गेल्यावर्षी उघड झालेल्या पनामा पेपर्समध्ये आढळले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पिठाने दिलेल्या 540 पानी निकालपत्रामध्ये संयुक्‍त तपास पथकाकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. या संयुक्‍त तपास पथकामध्ये “इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) आणि लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. याशिवाय या तपास पथकात फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, नॅशनल अकाउंटेबिलीटी ब्युरो आणि सिक्‍युरीटी एक्‍सचेंज कमिशन ऑफ पाकिस्तान या सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. आठवड्याभरात हे संयुक्त तपास पथक नियुक्‍त केले जाणार आहे आणि दोन आठवड्यांच्या कालावधीत या तपास पथकाचा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे शरीफ यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इमरान खान. जमात ए इस्लामीचे मीर सिराजुल हक आणि शेख रशिद अहमद यांनी पनामागेट प्रकरणातील सहभागाच्या मुद्दयावरून नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याची मागणी केली होती. परदेशातील आपल्या गुंतवणूकीसंदर्भात शरीफ यांनी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये आणि मे महिन्यात संसदेपुढे केलेल्या भाषणात चुकीची माहिती दिली असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. कतारमधील कंपनी विकून आपण लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचे शरीफ यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)