पनवेल महापालिकेचे निम्मे उमेदवार दहावी उत्तीर्ण !

पनवेल : पनवेल महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची आता शैक्षणिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवार तरुण असले तरी उच्चशिक्षितांचे प्रमाण मात्र अत्यल्प असल्याचे सांगण्यात येत आहे. 78 जागांसाठी 418 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यातील दोनशेहून अधिक उमेदवारांची धाव केवळ दहावीपर्यंतच आहे.
अवघ्या 16 उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे सुशिक्षितांना राजकारणात स्थान मिळत नसल्याचा आरोप सामाजिक संस्था करत आहेत.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत 78 जागांसाठी 418 उमेदवार आमनेसामने आहेत. एकूण उमेदवारांपैकी दोघांनी शिक्षणच घेतलेलं नाही, तर 34 उमेदवारांनी पाचवीनंतर शाळेला रामराम ठोकला आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हे स्पष्ट झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, डॉक्‍टर, अभियंता आणि वकील झालेले 16 जण आहेत.
पनवेल महापालिकेच्या आखाड्यात दोन असे उमेदवार आहेत, ज्यांना अक्षरओळखही नाही, पाचवी पास 34, नववी पास 103, दहावी पास 78, बारावी पास 89, पदवीधर 79 आणि पदव्युत्तर 16 उमेदवार आहेत. सुशिक्षित उमेदवार कमी असले तरी आपल्या पक्षाने डॉक्‍टर, इंजिनिअर , आर्किटेक्‍चर असे उच्च शिक्षित उमेदवार दिल्याचा दावा भाजपा आणि महाआघाडीने केला आहे. स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांनी राजकारणात आले पाहिजे असे सांगणारे राजकीय पक्ष मात्र निवडणुकीत गुंडाना, निराक्षराला उमेदवारी देत असल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. सभागृहात पश्न मांडण्यासाठी, शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी उच्चशिक्षित लोकपतिनिधींची गरज आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी शिक्षणाची अट कायद्यात आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)