पधारो गुजरातऐवजी छोडो गुजरात

गुजरातमध्ये प्रवेश करण्याच्या प्रत्येक मार्गावर पधारो गुजरात असे फलक लागलेले असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात गुजरातचा विकास किती झाला आणि तेथील बेरोजगारी किती कमी झाली, हा वादाचा मुद्दा असू शकेल; परंतु पूर्वीपासूनच गुजराते हे उद्योग क्षेत्रात पुढारलेलं राज्य होतं, हे नाकारण्यात अर्थ नाही. मोदी यांनी “व्हायब्रंट गुजरात’ च्या माध्यमातून देश-विदेशात गुजरातच्या उद्योग क्षेत्राचं मार्केटिंग केलं. कुणीही गुजरातच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाईटला साधी भेट दिली, तरी त्याला कुठं जागा आहेत, किती दिवसांत जागेचा ताबा मिळेल, उद्योगासाठी काय काय सवलती आहेत, याची माहिती दिली जाते. गुजरात उद्योगाला पायघड्या घालायला कायम तत्पर असतो. हिरा, कापड, रसायनं उत्पादनात गुजरातची आघाडी आहे. स्थानिक जनता एकतर शेतीत नाही, तर उद्योजक. त्यामुळं कामगार म्हणून बाहेरचेच लोक येतात. त्यातही बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमधून येणाऱ्यांची संख्या अधिक. कमी मोबदल्यात अधिक काम करणं हे त्यांचं वैशिष्ठ्य. हिरे उद्योगात तर थेट पश्‍चिम बंगालचे कारागीर सापडतात. उद्योग आणि स्वस्तातलं मजुरांचं कायम स्वागत करणारा गुजरात आता परप्रांतीयांच्या विरोधात इतका आक्रमक का झाला आणि आता परप्रांतीयांना संरक्षण देण्याइतका त्याच्यात बदल का झाला, हे एकदा समजून घ्यायला हवं.
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्यानं तणावाची परिस्थिती आहे. आत्तापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोक गुजरातमधून बाहेर गेल्याची माहिती आहे. या हल्ल्यांबद्दल देशभरातून चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यांशी संपर्क साधून परप्रांतीयांवरचे हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं. गुजरातमधील परप्रांतीयांवरच्या हल्ल्याचं समर्थन केलेलं नाही. संजय निरुपम यांच्यासारखं वादग्रस्त व्यक्तिमत्त्वच आगीत तेल ओतणारं वक्तव्य करू शकतं. प्रश्‍न गुजरातचा असताना उत्तर भारतीयांनी काम थांबविलं, तर मुंबई ठप्प होईल, असं आगखाऊ वक्तव्य करण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. तसंच मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघाशी त्याचा संबंध जोडण्याचं काहीच कारण नाही. विशेष म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम व छत्तीसगड या पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुजरातमध्ये घडणाऱ्या घटना भाजपची कोंडी करणाऱ्या आहेत. त्यामुळं तर आतापर्यंत चारशेहून अधिक लोकांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं पाऊल गुजरात सरकारनं उचललं. परिस्थिती नियंत्रणात असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं गुजरात सरकारनं म्हटलं आहे. गुजरातमध्ये परप्रांतीयांवर हल्ले वाढण्याला एका अल्पवयीन मुलीवर झालेलं बलात्काराचं प्रकरण कारणीभूत आहे. मुळात गुन्हेगाराला जात नसते; परंतु आपल्याकडं गुन्हेगार कोण आहे आणि पीडित कोण आहे, यावरून प्रकरण तापवायचं, की नाही, ते ठरतं. गुजरातमधल्या साबरकांठा जिल्ह्यात एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती आता सुधारते आहे. यात गुन्हेगार कोण, यापेक्षा त्याच्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन त्याला फाशीच व्हायला हवी. त्याला पाठिशी घालण्याचं काहीच कारण नाही. गुन्हेगार एका समाजातला, एका राज्यातला; म्हणून त्या समाजातील सर्वांवरच हल्ला करणं, त्या राज्यांतील लोकांना हुसकावून देणं योग्य नसतं. सांबरकाठा घटनेतला आरोपी हा बिहारमधला एक मजूर असल्याचं स्पष्ट झालं. या आरोपीला पोलिसांनी अटक ही केली आहे. वास्तविक त्याला शिक्षा होण्यापर्यंत त्या प्रकरणाचा पाठपुरावा करणं, हे त्या पीडित मुलीला न्याय देण्यासारखं झालं असतं. त्याऐवजी कायदा हातात घेऊन झुंडशाहीसारखं वर्तन करणं चुकीचं आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मुुझफ्फरनगर दंगल झाली होती. तिची जगात दखल घेतली गेली. सोशल मीडियावर बलुचिस्तानचे व्हिडिओ टाकून ते भारतातले आहेत, हे दाखविण्याचा प्रकार आमदार सोमसुंदर यांनी केला होता. समाज माध्यमांचा वापर चांगल्या कामापेक्षा वाईट कारणांसाठीच जास्त केला जात आहे. आता ही गुजरातमध्ये सांबरकाठाच्या घटनेनंतर “सोशल मीडिया’वरून प्रक्षोभक मेसेज पसरविले गेले. त्यानंतर हल्लयांना सुरूवात झाली. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधल्या नागरिकांना टार्गेट करण्यात आलं. त्यामुळं या राज्यांमधल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुजरातमध्ये हॉटेल्स आणि कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय तरुण आले आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला. ज्या भागात हल्लयांच्या घटना घडल्या, त्या भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह माहिती पसरविणाऱ्या काही समाजकंटकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरीही बिहार आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी आपल्या गावाकडं जाण्याचा मार्ग निवडला आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आदी ठिकाणांहून एरवी उत्तर प्रदेश, बिहारकडं जाण्यासाठी पूर्वी चार-पाच दिवसांतून एकही बस भरेल, एवढे प्रवाशी मिळत नव्हते, तिथून आता एकाचवेळी पन्नास-पन्नास बस सुटतात. त्यातही एका बसमध्ये सत्तर-ऐंशी लोक प्रवास करतात. रेल्वेनं जाणाऱ्यांची संख्याही तेवढीच आहे. एरवी, गुजरातमधून दिवाळी आणि संबंधित राज्यांच्या मोठ्या सणांना बाहेर जाण्यासाठीच बस, रेल्वेला गर्दी असते. लोकांच्या मनात भीतीचं सावट कायम असल्यानं परिस्थिती शांत होईपर्यंत गावी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. त्यातही गुजरात पोलीस मात्र सांबरकाठाच्या हल्ल्यामुळं लोक स्थलांतर करीत आहेत, हे स्वीकारायला तयार नाहीत. उत्तर भारतीयांवरच्या हल्ल्यांना ठाकोर सेना जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे; मात्र कॉंग्रेसचे आमदार अल्पेश ठाकुर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. सांबरकाठाच्या घटनेनंतर गुजरातमध्ये राहणाऱ्या उत्तर प्रदेशीय माणसबद्दलाचा रोष वाढत चालला आहे. साबरकांठा जिल्ह्यातल्या हिंमतनगर भागात राहणाऱ्या आणि अन्य राज्यांमधून आलेल्या मजुरांना गुजरातमधून निघून जाण्यासाठी धमक्‍या दिल्या जात आहेत. बलात्काराच्या या घटनेनंतर परप्रांतीय म्हणजेच अन्य राज्यांतून गुजरातमध्ये कामासाठी दाखल झालेल्या माणसांवर हल्ल्याच्या 18 घटना घडल्या आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात पोलिसांचे प्रयत्न अपुरे आणि अपयशी असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील मुलीवर अत्याचार झाला, त्यांच्याच घरावर आणखी संकट ओढवलं आहे. सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी त्यांचं दुकान बंद केलं. त्यामुळं त्यांचं उत्पन्न बंद झालं. त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत झाली. साबरकांठामध्ये महिन्याला 80 ते 90 कोटी रुपयांचा सिरॅमिकचा व्यवसाय आहे. यामध्ये काम करणारे 50 ते 60 टक्के कामगार गुजरातबाहेरचे आहेत. या घटनेनंतर 30 ते 35 टक्के कामगार उत्तर प्रदेशात परत गेले आहेत. त्यामुळं सिरॅमिक उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे. काहींना तर भीतीमुळं घराबाहेर पडता येत नाही. भाजीपाला मिळू शकत नाही. घरातील आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेता येत नाही, इतकी दहशत परप्रांतीयांमध्ये आहे. मारहाणीच्या भीतीपोटी लोक घरातून बाहेर पडण्याचं धाडस करीत नाहीत. गुजरात बाहेरून आलेली माणसं जिथं काम करतात, तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तरीही भय इथले अजून संपत नाही, अशी स्थिती झाली आहे. परप्रातीयांवरील हल्ल्याचा फटका केवळ गुजरातमध्ये बाहेरून आलेल्यांनाच बसला आहे, असं नाही, तर ज्या क्षेत्रात ही परप्रांतीय मंडळी काम करीत होती, तिथल्या उद्योजकांना, कारखानदारांना ही त्याचा फटका बसला आहे. काही ठिकाणी उत्पादन निम्म्यावर आलं आहे. काही ठिकाणी मालाच्या ऑर्डर मजूरच नसल्यानं पुरवता येत नाहीत. बाहेरच्या राज्यातील मजूर हे अंगमेहनतीचं काम करणारे आहेत. स्थानिक मजूर फारसे नाहीत. त्यामुळंच तेथील उद्योगांवरही हे नवं संकट आलं आहे. गुजरात सरकार जोपर्यंत कृतीतून परप्रातींयांना सुरक्षिततेची हमी देत नाही, तोपर्यंत परतण्याची मानसिकता सध्या तरी दिसत नाही. अर्थात हे गुजरातमध्येच घडतं असं नाही. गुन्हेगाराला पाठिशी घालणं योग्य नाही; परंतु त्याची शिक्षा अन्य लोकांना कशासाठी ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)